अण्णा नवथर
अहमदनगर : इतर देशांतून केलेली आयात, साठेबाजीवर घातलेल्या निर्बंधामुळे कांद्याचे भाव निम्म्याने घटले आहेत. कांदा १० हजारांहून पाच हजारांवर खाली आला असून, पाडव्यानंतर कांदा पुन्हा भाव खाईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पावसामुळे लाल कांदा वाया गेला. त्यामुळे नवीन लाल कांदा विक्रीसाठी न आल्याने उन्हाळी कांदा मध्यंतरी प्रति क्विंटल दहा हजारांवर पोहाेचला होता. नगरसह नेवासा आणि शेवगाव बाजार समितीत आवक वाढूनही कांद्याला चांगला भाव मिळाला. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता होती. पुण्यात कांदा प्रति किलो १०० रुपयापर्यंत गेला होता. असे असतानाच दसऱ्याला अचानक कांद्याचे भाव पडले. कांद्याचे भाव निम्म्याने घटले. भाव वाढत असल्याने सरकारने कमी करण्यासाठी साठेबाजीवर निर्बंध आणले. त्यामुळे नाशिक येथील बाजारात लिलाव झाले नाहीत. त्याचा परिणाम नगरसह अन्य जिल्ह्यातील कांद्याच्या दरावर झाले.
सरकारने तुर्की व इजिप्तमधून कांदा आयात केला. मात्र आयात केलेल्या कांद्याला चव नसल्याने त्याला उठाव नाही. हा कांदा मुंबई व पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. परंतु, ग्राहकांनी विदेशी कांद्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे कांदा आयात होऊन दर वाढत होते. त्यामुळे सरकारने कांद्याच्या साठेबाजीवर निर्बंध आणत २५ टनाहून अधिकचा साठा असलेल्या चाळींवर कारवाई केली. राज्यातील सर्वात मोठे नाशिक मार्केट यामुळे तीन दिवस बंद होते. सरकारच्या साठेबाजीच्या धोरणामुळे कांदा व्यापारी हवालदिल आहेत.
महाराष्ट्रासह अन्य राज्यातील कांदा मार्केट विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम दरावर होत आहेत. त्यात मध्यप्रदेशमधील कांद्याची आवक मध्यंतरी सुरू झाली होती. ती आता बंद झाली असून, कांद्याचे भाव पुन्हा वाढतील. परंतु, दिवाळी सण तोंडावर आल्याने कांद्याचे लिलावर काही दिवसांसाठी बंद राहतील. त्याचाही परिणाम कांदा लिलालावर होण्याची शक्यता असून, पाडव्यानंतरच खरेदी- विक्री सुरळीत होईल. त्यावेळी कांद्याला भाव मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लाल कांदा झाला खराब
जिल्ह्यातील शेवगाव आणि संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांद्याची आवक काही प्रमाणात होऊ लागली आहे. परंतु, हा कांदा पावसामुळे खराब झाला असून, तो वाहतुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे लाल कांद्याचे आवक होऊनही कांद्याचे भाव वाढतील, असा अंदाज आहे.
मागील आठवड्यातील कांद्याचे भाव
नगर- ५ ते ७ हजार
संगमनेर- ४५०० ते ५५००
शेवगाव- ४५०० ते ५०००
घोडेगाव- ४५०० ते ६५००
इतर देशातून कांदा आयात करण्यात आला. तसेच कांदा साठविण्यावर सरकारने बंदी घातल्याने नाशिकचे मार्केट बंद होते. त्यात मध्यप्रदेशाचाही कांदा आला होता. त्यामुळे कांद्याचे भाव पडले असून, मार्केट सुरळीत झाल्यानंतर भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
-दिलीप ठोकळ, अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन, अहमदनगर