अहमदनगर : नेप्ती उपबाजार समितीात गुरुवारी सकाळी कांद्याचे लिलाव सुरु होताच चांगल्या प्रतीच्या कांद्याला १२ ते १४ रुपये भाव व्यापा-यांनी जाहीर केला. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडून उपबाजार समितीबाहेर बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.मागील आठवड्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता. मात्र, या आठवड्यात बाजारभाव एकदम खाली आले. त्यामुळे शेतक-यांमध्ये संताप पसरला. कांद्याला किमान २० रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत शेतक-यांनी बाजार समितीत घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर काही वेळातच शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीसमोरील बाह्यवळण रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले.गुरुवारी सकाळी लिलाव सुरु झाल्यानंतर बाजार भाव एकदम १२ ते १४ रुपये जाहीर करण्यात आले. त्यामुळे शेतकरी एकदम चिडले. संतप्त शेतक-यांची बाजार समितीच्यावतीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, शेतक-यांनी किमान २० रुपये किलो भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर शेतक-यांनी थेट बाह्यवळण महामार्गावरच ठाण मांडले. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली़ बाजार समितीने शेतकरी व व्यापा-यांशी चर्चा करुन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
नेप्ती उपबाजारात कांद्याचा वांदा; भाव पडल्यामुळे शेतक-यांनी केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:46 PM