अहमदनगर : जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे जोर धरू लागले आहे. जि. प. प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेसाठी कार्यवाही सुरू केली असून बदलीसाठी आॅनलाईन अर्जाची सक्ती करण्यात आली आहे. प्रारूप सेवा ज्येष्ठता यादीपासून बदली विकल्प आणि अंतिम सेवा ज्येष्ठता यादीचे वेळापत्रक तयार करण्यात आले. प्रत्येक विभागाच्या खातेप्रमुखाने कोणत्याही कर्मचाऱ्यांचा परस्पर बदली अर्ज घेवून त्यावर कार्यवाही करू नये, अशी तंबी सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि त्यांच्या टीमने बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कोणत्या तारखेपर्यंत कोणकोणत्या प्रक्रिया पूूर्ण गरजेचे आहे, याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशाच्या प्रति तालुका पातळीवरील कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवण्यात आल्या आहेत. न्यायालयाने ठरवून दिल्याप्रमाणे आदिवासी भागातील रिक्त जागा पेसा कायद्याप्रमाणे भरल्यानंतर तालुकानिहाय कर्मचाऱ्यांचे समानीकरण करण्यात येणार आहे. यात ५ टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया तालुकास्तरावर शिक्षक आणि परिचर या संवर्गासंदर्भात राबवण्यात येणार आहे. २८ एप्रिलला सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रारूप ज्येष्ठता यादी, त्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांचा तपशील प्रत्येक विभागाने २९ एप्रिलला, २५ एप्रिल ते २ मे पर्यंत बदलीचे विकल्प, प्रारूप सेवा ज्येष्ठता यादीवर २ मे ला सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती, कर्मचाऱ्यांच्या बदलीची आॅनलाईन अर्जाची प्रत आणि ५ मे ला कर्मचाऱ्यांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून समुपदेशनाने या बदल्या होणार आहेत. (प्रतिनिधी)
बदल्यांसाठी आॅनलाईन अर्जांची सक्ती
By admin | Published: April 25, 2016 11:16 PM