१२ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारकपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने राजकोट येथून कुरिअरच्या माध्यमातून कपडे मागविले होते. पार्सल वेळेत न मिळाल्याने या महिलेने गुगलवर सर्च करून एक्स्प्रेसबीस या कुरिअर कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक मिळवला. प्रत्यक्षात हा नंबर बनावट होता. या क्रमांकावर महिलेने पार्सलविषयी विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितले की तुमचे पार्सल नगर येथे आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ते तुमच्या घरी पोहोचले नाही. आपली तक्रार कुरिअर कंपनीला पाठवितो असे सांगून सदर व्यक्तीने त्याच्या नंबरवर गुगल-पेच्या माध्यमातून एक रुपया पाठविण्यास सांगितले. महिलेने तिच्या गुगल-पेवरून समोरील व्यक्तीला एक रुपये पाठविल्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यातून तत्काळ पाच हजार रुपये कपात झाले. यावेळी महिलेने परत सदर नंबरवर फोन करत पाच हजार रुपये कपात झाल्याचे सांगितले असता त्या व्यक्तीने सांगितले की, आम्ही एक लिंक पाठवतो ती लिंक फॉलो करा, तुमचे पैसे परत मिळतील. त्यानंतर समोरील व्यक्तीने पाठवलेली लिंक ओपन करत महिलेने पुढील प्रक्रिया केली तेव्हा तिच्या खात्यातून आणखी पैसे कपात झाले. असे एकूण ७९ हजार ८४४ रुपयांची महिलेची फसवणूक झाली.
........
कस्टमर केअर नंबर शोधताना सावधान
फसवणुकीच्या उद्देशाने सायबर गुन्हेगारांनी इंटरनेटवर वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट क्रमांक टाकून ठेवलेले असतात. ग्राहक कस्टमर केअरचा क्रमांक समजून या क्रमांकाला फोन लावल्यानंतर त्यांची फसवणूक होते. त्यामुळे कस्टमर केअरला संपर्क करताना दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.