४० टक्के अनुदानावरील सभासदांना संस्थेचे सभासद करून घेणे आणि कर्जावरील व्याजदर अर्धा टक्के कमी करणे, असे विषय आजच्या सभेत मंजूर करण्यात आले.
माध्यमिक शिक्षक संस्थेची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी अध्यक्ष चांगदेव खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, धनजय म्हस्के, महेंद्र हिंगे, बाबासाहेब बोडखे तसेच इतर संचालक यावेळी उपस्थित होते.
ऑनलाइन सभेमुळे ऑफलाइनप्रमाणे होणारा गोंधळ, घोषणाबाजी यावेळी झाली नाही. यावेळी सभासदांनी सेवानिवृत्त सभासद व ठेवीदारांना संस्थेचे अ वर्ग सभासद करून घेण्यास विरोध केला. सभासदांनी आपले प्रश्न ऑनलाइन विचारून सभेत भाग घेतला.
कचरे म्हणाले, सेवानिवृत्त सभासदांना संस्थेचे मूळ सभासद करण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले, तसेच संस्थेने कर्जमर्यादा १४ लाख करूनही कर्ज घेण्याचे प्रमाण कमी असल्याने, यापुढे जामीन कर्जावरील व्याजदर साडे आठ टक्क्यावरून आठ टक्के करण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना व इतर कर्मचारी यांना शासनाचे ४० टक्के अनुदान मंजूर झाले आहे, त्यांना संस्थेचे सभासद करून घेण्यात येणार आहे. मयत निधीची वर्गणी १५० रुपयांवरून २०० रुपये करण्यात येणार असून, मयत झालेल्या सभासदाला आता ४ लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपये मिळणार आहेत.
प्रास्ताविक अध्यक्ष चांगदेव खेमनार यानी केले. आप्पासाहेब शिंदे व बाबासाहेब बोडखे यांनी नाराजी व्यक्त केली. सुनील दानवे, संतोष ठाणगे, किरण धाडगे, मंगेश काळे, राहुल बोरुडे, दादा साळुंके, विजय साळवे आदींनी सभेत सक्रिय सहभाग घेतला. सचिव स्वप्निल इथापे यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले.