अहमदनगर : कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये ६ मे पासून उघडणार आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत होणार आहेत.मुद्रांक शुल्क विषयक नोंदणी आॅनलाईन प्रणालीद्वारे पूर्ववत सुरु करण्याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय हे कलम १४४ चे पालन करुन ६ मे पासून सुरू होत आहेत, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.शासनाने याबाबत काही अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत. कंटेन्मेंट झोन घोषित केलेल्या क्षेत्राचा प्रतिबंधित कालावधी पूर्ण झाल्यानंतर तेथे दस्तांची नोंदणी सुरु करावी. कार्यालये सुरु करण्याच्या दिवशी व नंतर किमान प्रत्येक ७ दिवसांनी निर्जंतूक करुन घ्यावीत. नागरिकांना दस्त नोंदणीसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ईस्टेपद्वारे व इतर ठिकाणी ईस्टेप इन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील. दस्त छाननी सादरीकरण झाल्यावरच इतर पक्षकारांना कबुली जबाब देण्यासाठी नावाच्या क्रमवारीनुसार प्रवेश द्यावा. एकावेळी जास्तीत जास्त चारच पक्षकारांना आत प्रवेश द्यावा. बायोमेट्रिक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व नंतर ते निर्जंतुक करावे. कर्मचाºयांनीही मास्क, ग्लोव्हज घालावे व सर्वांना सॅनिटायझर उपलब्ध करावे.बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाजाचे हॅन्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची आदींचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. कार्यालयात टेबलांमधील अंतर किमान २ मीटर ठेवावे. नागरिकांना तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधण्याबाबत सक्ती करावी, तसेच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये पुरेसे अंतर राहील यादृष्टिने खुणा कराव्यात. आवश्यकता असल्यास पोलिसांची मदत घ्यावी. दस्त नोंदणी कार्यालयात ३३ टक्के कर्मचाºयांनी उपस्थित रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बँक व बँकेतर वित्तीय संस्थांच्या वित्तपुरवठा कामकाजाकरिता मुद्रांक विकेत्यांकडून मुद्रांक पेपर फ्रँकिंग, बँकाकडून ईएसबीटीआर घेणे शक्य झालेले नाही. निष्पादीत करण्यात आलेल्या दस्तांचे मुद्रांक शुल्क विहित मुदतीमध्ये भरणे शक्य झाले नाही. अशा दस्तांचा भरणा ६ मे रोजी करता येईल, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.