अहमदनगर : आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करत सोयीच्या शाळेत बदली मिळविलेल्या २३४ गुरुजींच्या बदल्या शिक्षण विभागाने अपात्र ठरविल्या आहेत. अपात्र शिक्षकांना सुनावणीसाठी हजर राहा, असा आदेश जिल्हा परिषदेने बुधवारी सायंकाळी काढला आहे. शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या किंवा बदली नाकारणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केलेली तपासणी बुधवारी सायंकाळी पूर्ण झाली. फेरतपासणीचा अहवाल शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना सादर केला आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या फेरतपासणीत संवर्ग १ मधील अपंगाचे आॅनलाईन प्रमाणपत्र नसणे, सन २०११ पूर्वीचे प्रमाणपत्र सादर करणे, मेंदूविकार, पॅरेलिसिस, कॅन्सर, हृदय शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्रांची खात्री न झाल्याने १५० शिक्षकांच्या झालेल्या बदल्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ तसेच संवर्ग २ मध्ये पती-पत्नी सेवेचा दाखला नसणे, वैयक्तिक मान्यता नसणे, पती-पत्नींच्या शाळांत अंतर ३० कि़मी़ पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्याने ७८ शिक्षकांच्या बदल्या बाद ठरविण्यात आल्या आहेत. शासनाने आॅनलाईन बदली प्रक्रियेतील संवर्ग १ व २ मधील शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यासाठी अंतिम मुदत १० जुलैपर्यंत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दोन्ही संवर्गातील बदली झालेल्या किंवा बदली नाकारणा-या १ हजार ५६१ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी केली. शिक्षकांनी आॅनलाईन सादर केलेल्या प्रमाणपत्रांची छाननी करण्यात आली. छाननीत त्रुटी आढळून आलेल्या शिक्षकांना नव्याने पुरावे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.शिक्षकांनी नव्याने पुरावे सादर केले. नव्याने सादर केलेले पुरावे व आॅनलाईन सादर केलेले प्रमाणपत्रे, याची तुलना करण्यात आली. बदलीस अपात्र ठरविलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची खात्री झाली नाही. त्यामुळे त्यांच्या बदल्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, शिक्षकांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.मुख्यकार्यकारी अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून शुक्रवारपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीत शिक्षकांनी समाधानकारक माहिती न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
आॅनलाइन बदलीप्रकरण : २३४ गुरुजींचे पितळ उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 2:20 PM