अहमदनगर : आईचे निधन झाले. आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले, ते पुरुषांनी नव्हे तर महिलांनीच. पाणी पाजणे, खांदा देणे, अंत्यविधी आदी सर्व विधी महिलांनीच पार पाडले. आईच्या स्मरणार्थ दहावा न करता स्नेहालयातील मुलांना एकवेळचे जेवण देण्यात आले. परंपरेला छेद देत पाचही महिलांनी क्रांतिकारी पाऊल उचलले. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी केलेल्या अंत्यविधीची भिंगार परिरसरात चर्चा आहे.
परंपरेनुसार कोणाचेही निधन झाले तरी अंत्यविधी पुरुषांकडूनच केला जातो. मात्र आलमगीर-भिंगारमधील महिलांनी या परंपेरला फाटा दिला आहे. जिल्हा रुग्णालयात परिचारिका असलेल्या अंजली उमाकांत शिडे यांच्या मातोश्री मंगल उमाकांत शिडे यांचे गुरुवारी (दि. ४) निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली व दोन भाच्या असा परिवार आहे. वंदना, दुर्वा, कांचन, वृंदा व अंजली या पाचही मुली विवाहित आहेत. त्यांनीच आईचा अंत्यविधी केला. अंत्यविधीप्रसंगी जे काही विधी आहेत, ते मुलींनीच पार पाडले. आईचा दफनविधी त्यांनी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. एकाही विधीला या पाचही मुलींनी एकाही पुरुषाची मदत घेतली नाही. रुढी-परंपरेनुसार होणारा दिवसाचा कार्यक्रमही त्यांनी टाळला. यासाठी येणारा संभाव्य खर्चाची रक्कम त्यांनी रविवारी (दि. ७) स्नेहालयास दिली. तेथील ३०० मुलांच्या दुपारच्या जेवणाइतकी रक्कम त्यांनी दिली. महिलांच्या या पुढाकाराला नातेवाईक, ज्येष्ठ मंडळींनी पाठिंबा दिला. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी स्नेहालयाला दिलेल्या मदतीमुळे एक वेगळा संदेश समाजात गेला.
-------
फोटो- ०७ मंगल शिडे