विनोद गोळेपारनेर : वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेले काहीजण तर काहीजण नुकतीच मिसरुड फुटलेले आणि बेरोजगारीच्या चक्रव्यूहात आयुष्य करपून दाढीची खुंटं पांढरे झालेले काहीजण असे सारे एकाच रांगेत उभे आहेत. नोकरीच्या शोधात़ बेरोजगारीचे हे भयावह चित्र सुपा येथील नोकरी मेळाव्यात दिसून आले़दहावीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलेले असे हजारोजण नोकरी मेळाव्याच्या रांगेत बेकारीचा शिक्का पुसण्यासाठी उभे होते़ जमीन आहे, पण पाणी नाही़ पाणी जरी असले तरी शेतमालाला भाव नाही़ त्यामुळे कुटुंबकबिला चालवायचा कसा? या प्रश्नाच्या विवंचनेने मिसरुड फुटलेला तरुणही नोकरी मेळाव्याच्या रांगेत होता़ आई, वडिलांची अपेक्षा मुलाने नोकरी करावी़ पण नोकरी मिळत नाही़ आई, वडिलांना आधार द्यायचाय, पण तो आधार शोधायचा कुठे, असेही प्रश्न या तरुणाईच्या घोळक्यात डोकावत होते़ निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने सुपा येथे रविवारी नोकरी मेळावा आयोजित केला होता.मेळाव्यातील काही युवकांबरोबर ‘लोकमत’ने चर्चा केली़ त्यांच्या भावना जाणून घेतल्या़ नगर तालुक्यातील मेहेकरी येथील युवक किरण गर्जे, सोनू गर्जे, अमोल पालवे भेटले. घरी शेती आहे़ पण पावसाने धोका दिल्याने सर्व कुटुंब कर्जबाजारी झालेय़ म्हणून नोकरीच्या शोधात आल्याचे विक्रम गर्जे याने सांगितले. पारनेर तालुक्यातील मुंगशी येथील विक्रम थोरात, सिद्धेश्वरवाडीचे गोरक्षनाथ कावरे व बुगेवाडी येथील युवकांचीही हीच व्यथा़ यातील काही तरुण दहावी पास, काही बारावी, बहुतांशी तरुण पदवीधर, काही आयटीआय, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले होते़ युवतींची संख्याही मोठी होती़नोकरी मेळाव्यात सुमारे ७५ कंपन्यांनी सहभाग घेतला़ निलेश लंके यांनी युवकांची बेरोजगारी पाहूनच याचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जशा जागा उपलब्ध होतील तसा या मेळाव्यातील युवकांना रोजगार दिला जाईल़ सध्या सहा हजार युवकांच्या नोकरीचे नियोजन केले आहे.- दादा शिंदे, निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर तालुका