कोपरगाव : जागतिक दर्जाचे देवस्थान असलेल्या शिर्डीसह पंचक्रोशीतील हजारो कुटुंबांचा रोजगार शिर्डीच्या श्री साई मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर उघडल्याशिवाय अनेक कुटुंबांची रोजीरोटी सुरू होणार नाही, मोठ्या प्रमाणात आर्थिक घडी विस्कटलेली असून अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शिर्डीचे साईमंदिर खुले करून शिर्डी व परिसरातील अर्थकारणाला गती द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हे म्हणाल्या, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साई मंदिर गेल्या वर्षी बंद होते. मध्यंतरीच्या काळात लाॅकडाऊन उठविण्यात आल्याने ब-याच दिवसांनी मंदिर सुरू झाले; परंतु पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने मंदिर बंद झाले. त्यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला खीळ बसली असून शिर्डी व परिसरातील हजारो कुटुंबांचा रोजगार बंद झाला आहे. जगदविख्यात तीर्थक्षेत्र शिर्डीमधील व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून असून या लाॅकडाऊन काळात बंद असलेल्या मंदिरामुळे या व्यवसायातील अनेक बेरोजगार झाले. हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंट मोठ्या प्रमाणात असलेल्या शिर्डीत अनेकांवर कर्जाचा बोजा पडला आहे.
वास्तविक सध्याच्या परिस्थिती कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली, असून लसीकरणाची मोहिमेही सुरळीत सुरू आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे, यामुळे नागरिकांसाठी दिलासादायक परिस्थिती आहे. शिर्डीकरांच्या दृष्टीने मंदिर सुरू व्हावे, हीच बाब दिलासादायक आहे. मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिकांना मोठ्या आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. हातावर पोट असलेले अनेक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, फूल मार्केट, रिक्षा-टॅक्सीचालक तसेच छोटे-मोठे दुकानदार मंदिर बंद असल्यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.