कर्जत : राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे घंटानाद आंदोलनानंतर बोलताना दिला.
कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र मंदिर सुरू करण्यास परवानगी दिली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. मंदिरे बंद असल्याने या संबंधात असलेले सर्व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारने देशातील मंदिरे सुरू करण्याबाबत राज्यांना सूचना दिल्या आहेत. शिवाय न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला फटकारले आहे. मात्र राज्यातील आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यांच्यातील भांडणे झाकण्यासाठी हे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. यामुळे मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही, असा आरोपही शिंदे यांनी केला.
यावेळी कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, बाळासाहेब महाडीक, सचिन पोटरे, सुनील गावडे, भारत मासाळ, राहुल निंभोरे, स्वप्निल देसाई, एकनाथ धोंडे, शांतीलाल कोपनर, विश्वास डमरे, सुनील यादव, रामदास हजारे, अमृत काळदाते, अनिल गदादे उपस्थित होते.