गणोरे : अकोले तालुक्याच्या आढळा परिसरात सोमवारपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आढळा नदी दुथडी भरून देवठाण येथील आढळा धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पाण्याचा वेग रात्रभर टिकून राहिल्यास बुधवारी धरण भरेल. गेल्या आठवड्यात उघडलेल्या पावसाने धरण भरण्याची साशंकता वाढली होती. सोमवारपर्यंत धरणात क्षमतेच्या सुमारे पन्नास टक्के पाणीसाठा होता.सावरगाव पाट शिवारातील प्रेक्षणीय तव्याचा धबधबा पुन्हा विहंगम स्वरूपात अवतरला असून निसर्गप्रेमींची गर्दी वाढली आहे. आढळा परिसरातील संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रहदारीच्या रस्त्यांवर पाणी व चिखलामुळे दुरवस्था होऊन दळणवळणाची मोठी गैरसोय झाली आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात नदीच्या पात्रातील पुलांवरील पाण्यामुळे संपर्क तुटला आहे. दिवसभर विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांची कुचंबणा झाली. जनावरांचीही उपासमार झाल्याचे दिसून आले. मुसळधार पावसाने पाणलोट क्षेत्रातील पाडोशी (१४६ दशलक्ष घनफूट ) व सांगवी (७१.२३ दशलक्ष घनफूट ) लघु पाटबंधारे तलाव भरुन देवठाण येथील आढळा धरणाच्या पाणी साठ्यात नवीन पाण्याची आवक सुरू झाली होती. (वार्ताहर)
आढळा भरण्याचा मार्ग मोकळा
By admin | Published: August 02, 2016 11:56 PM