अहमदनगर : तालुक्यातील साकळाई पाणी योजनेबाबत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती़ त्यांनीच तालुक्यात येऊन पाणी योजनेबाबत बोलावे, असा अग्रह होता़ आता मुख्यमंत्रीच वाळकीत येत असून, त्यांच्या समोर सकाळाई पाणी योजनेचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी वाळकी येथे शनिवारी झालेल्या सभेत दिले़महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाळकी येथे मंगळवारी (दि. १६)होत असलेल्या सभेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी माजीमंत्री बबनराव पाचपुते, दिलीप भालसिंग, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, राजेंद्र भगत, दीपक कार्ले, नगरसेवक योगिराज गाडे, रवींद्र कडूस, रवींद्र भापकर, शरद बोठे, रमाकांत बोठे, प्रवीण कोकाटे, मनोज कोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. विरोधकांना साकळाई पाणी योजनेचा प्रश्नच माहिती नाही, या राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले़ ते म्हणाले, की तालुक्यातील साकळाई पाणी योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या योजनेतील अडथळा त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता़ त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी साकळाई पाणी योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. पण, विरोधी उमेदवार साकळाई योजना पूर्णपणे मार्गी लागली असून, यावर आता फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे, असे सांगत आहेत. नेमकी वस्तुस्थिती महायुतीच्या कार्यकर्त्यांसह या तालुक्यातील सामान्य माणसाला कळली पाहिजे, आणि मुख्यमंत्र्यांनीच साकळाई योजनेबाबत तालुक्यात येऊन भाष्य करावे, असा आग्रह आपला होता. मुख्यमंत्र्यांनी सभेस येण्याचे मान्य केल्यामुळे साकळाई योजनेबाबता मुख्यमंत्री बोलतील, असा विश्वास यावेळी विखे यांनी व्यक्त केला़पाणीप्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार- पाचपुतेश्रीगोंदा तालुक्याची औद्योगिक वसाहत असेल किंवा या भागाच्या प्रलंबित पाणी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले़ ते म्हणाले, निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्यात आता डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभेनंतर आता मुख्यमंत्र्यांची सभा महायुतीच्या प्रचारासाठी निर्णायक ठरेल असे पाचपुते म्हणाले़
विरोधकांना साकळाई पाणी योजनाच माहित नाही : सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:06 PM