कोपरगाव : माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी महसूलमंत्री असताना कोपरगाव नगरपालिका साठवण तळ््यासाठी येसगाव परिसरात पालिकेला शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज शहरवासीयांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक झाली. ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत असून पाणीप्रश्नी त्यांचे फक्त राजकारण सुरू आहे. आपल्या प्रयत्नांना कुणीही एकत्रित साथ देत नाही, अशी खंत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.शहरातील दत्तनगर परिसरात बुधवारी सायंकाळी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. निळवंडे शिर्डी कोपरगाव पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे, असा निर्धार कोल्हे यांनी व्यक्त केला. प्रारंभी नगरसेवक शिवाजी खांडेकर, गटनेते रवींद्र पाठक, फिरोज पठाण यांनी केंद्र व राज्य शासनामार्फत शहर विकासासाठी कोणत्या योजना आणल्या आणि भविष्यकालीन संकल्पना काय आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. अविनाश पाठक, सनी वाघ यांच्यासह छत्रपती बॉईज आणि मावळा ग्रुपच्या युवकांनी आमदार कोल्हे यांच्या विकास कामाची माहिती जाणून घेतली.कोल्हे म्हणाल्या, शहरवासीयांना पिण्याचे शुध्द २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. सध्या चार आणि पाच नंबर साठवण तळे कामासंदर्भात विरोधक उलटसुलट माहिती देऊन आपल्याविषयी नागरिकांना भडकावून देण्याचे काम करीत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. पाच नंबर साठवण तळ्याचे काम मार्गी लागावे. यासाठी पाठपुरावा केला. पाच नंबर साठवण तळ्याचे काम लवकर व्हावे. त्यात आपली आडकाठी नाही, मात्र निळवंडे शिर्डी पाणी योजना पहिल्या टप्प्यात सुरू होताना पुढे कोपरगावपर्यंत केली असताना त्यास औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या ठिकाणांहून याचिका दाखल करून आडकाठी आणली. पण ही योजना आपणच पूर्ण करणार आहोत. शहर विकासाचे वैभव वाढवून येथील ऐतिहासिक स्थळांचे पर्यटकीय महत्व ओळखून त्यावर काम केले आहे. उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पाणीप्रश्नाला विरोधकांनीच खोडा घातला-स्नेहलता कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:51 PM