अहमदनगर : विरोधक घाबरलेले आहेत. त्यामुळे तेच पक्षांतराची चर्चा करीत आहेत. मात्र आमदार संग्राम जगताप यांचे काम चांगले आहे. तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. जगताप यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चा निष्फळ असल्याचेही ते म्हणाले. जे कोणी आमदार जगताप यांच्या विरोधात बोलत असतील त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी पक्षाकडे करणार का ? असा प्रश्न केला असता विधाते म्हणाले, पक्षाला सगळे समजते. आम्ही पालिकेत भाजपाला पाठिंबा दिला. त्यावेळी आमच्यावर पक्षाने कारवाई केली. तशी कारवाई आमदारांविरोधात बोलणाºयांवरही करू शकतात. सोशल मीडियावर पक्षाचे चिन्ह नसलेल्या पोस्ट व्हायरल होत असल्याकडे लक्ष्य वेधले असता विधाते म्हणाले, की याबाबत मला काही माहिती नाही. असे सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले.अहमदनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. या कारणावरुन प्रा.विधाते यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांचे समर्थक असलेल्या प्रा. विधाते यांना पुन्हा हे पद प्रदेशाध्यक्षांनी बहाल केले. पद स्वीकारल्यानंतर प्रा.विधाते यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेवून शहरातील राजकीय अफवांना उत्तर दिले आहे.
विरोधक घाबरलेले; संग्राम जगताप हेच राष्ट्रवादीचेच उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:38 PM