कोतूळ : स्वत: च्या मंत्रीपदाचा त्याग केला परंतु आदिवासींचे आरक्षण शाबूत ठेवले. काही तालुक्यातील विघ्नसंतोषी माझा खोटा दाखला घेऊन कोर्टात गेले. माझ्याविरोधात निकाल लागला असता तर माझ्यासह राज्यातील सर्व आदिवासींचे आरक्षण संपले असते, अशी टीका माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केली. सातेवाडी (पळसुंदे) येथील गाव भेटी दरम्यान त्यांनी ही टीका केली. पिचड म्हणाले, जातीचे दाखले खोट्या आदिवासींना देऊन आरक्षण संपवणाºयांनी आदिवासींच्या नावावर मते मागू नयेत. वेळ प्रसंगी विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात गेलो. राष्ट्रपती, राज्यपालांची भेट घेतली. राज्यातील आदिवासी तरुणांना एकत्र करून नाशिकला रेल रोको आंदोलन केले. पेसा कायदा केला. उच्च दर्जाच्या आश्रमशाळा काढल्या. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण, पळसुंदे, येसरठाव, मुळेत पाच धरणे, अकोल्यातील अगस्ती, दूध संघ, फोपसंडी, बिताका, कोंभाळणे-ओतूर रस्ता, वाडी वस्तीवर वीज असे प्रकल्प तालुक्यात आणले. पाच वर्षे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता. एखाद्या रस्त्याचा खड्डा बुजवला का ? सातेवाडी गटातील पळसुंदे, कोहणे, साकीरवाडी, खडकी येथे भाजप उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारासाठी गाव बैठका घेण्यात आल्या. पांडुरंग कचरे, जुन्नर बाजार समितीचे संचालक देवराम मुंढे, काशिनाथ साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास गायकर, पांडुरंग कचरे, किसन शिरसाठ, सुभाष वायळ, चंद्रकांत गोंदके, चिमाजी ऊंबरे, दत्तू मुठे आदी उपस्थित होते.
आम्ही पिचडांबरोबर - रंजना मेंगाळ आमदार वैभव पिचड यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही अकोले पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ यांनी राजूर येथे प्रचारसभेत दिली. याबरोबरच पंचायत समितीचे अकरा सदस्यही त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. अकोले येथील भाजपच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सभापती मेंगाळ बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय बो-हाडे, गोरख पथवे, सारिका कडाळे, नामदेव आंबरे, दत्तात्रय देशमुख, देवराम सामेरे , सीताबाई गोंदके, ऊर्मिला राऊत, अलका अवसरकर, माधवी जगधने उपस्थित होते.