श्रीरामपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना निर्णयाचे अधिकार आहेत. मात्र, ग्रामपंचायतीमध्ये सर्वस्वी सरपंच यांनाच स्वतंत्र भूमिका बजावता येते. त्यामुळे ग्रामीण भागात विकास करून चेहरामोहरा बदलून टाकण्याची त्यांना संधी आहे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले. तालुक्यातील टाकळीभान येथे मंगळवारी रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात १३ ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार लहू कानडे बोलत होते.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, इंद्रनाथ पाटील थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरूण नाईक, वंदना मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, प्रा. कार्लस साठे, राजेंद्र कोकणे आदी यावेळी उपस्थित होते.
कानडे म्हणाले, ग्रामपंचायत हे शंभर टक्के सरकारी कार्यालय आहे तर सरपंच व ग्रामसेवक हे लोकसेवक आहेत. त्यामुळे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी जनतेच्या मूलभूत गरजा सोडवून गावाचा विकास करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्नशील रहावे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करावा व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
----------