अहमदनगर : भाजप सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय. काँग्रेस नेते व खासदार राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या देशात आज बोलण्याचीही मुभा राहिलेली नाही. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस येत्या काळात लोकशाही जिवंत राहण्यासाठी व लोकांच्या विविध प्रश्नांवर भाजप सरकारविरोधात आता थेट रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती माजी महसूलमंत्री व आमदार बाळासाहेब थाेरात यांनी दिली.
येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, राहूल गांधी यांनी भाजपविरोधात आवाज उठविला होता. मात्र, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकाने केला आहे. ईडीसारख्या संस्था विरोधकांच्या पाठिशी लावून भाजप सरकार लोकशाही संपवू पाहत आहे. राहूल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मोदींनी उत्तरे देण्याऐवजी गांधी यांच्यावरच कारवाई केली गेली आहे. देशात महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसची महासभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी घडलेली घटना निंदनीय आहे. या घटनेची शासनाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यात शांतता कशी नांदेल, याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, असेही थोरात म्हणाले.