शिर्डी : विरोधी पक्षाचे नेते सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत. एक नेते म्हणाले, पंधराशे रुपयांत काय होते; पण तुम्ही चाळीस वर्षे राज्य केले. फुटकी कवडी तरी बहिणींना दिली का? खबरदार, आमच्या लाडकी बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली, तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.
शिर्डीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार अशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आदी उपस्थित होते.
ही योजना बंद करायचा विरोधकांचा विचार
फडणवीस म्हणाले, आम्ही योजना सुरू केल्यानंतर काही सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले.
आम्ही मोठा वकील उभा केला आणि योजनांवर स्थगिती येऊ दिली नाही; पण सावत्र भावांची नियत बघा. काल-परवा आदित्य ठाकरे म्हणाले, आमचे सरकार येऊ द्या, महायुतीच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय आम्ही रद्द करून टाकू. म्हणजे यांच्या डोक्यात लाडकी बहीण योजना बंद करायचा विचार आहे.
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या, ही योजना म्हणजे बहिणींना दिलेली लाच आहे. अरे काही शरम करा. हा कोणाच्या बापाचा पैसा नाही, जनतेचाच पैसा आहे. त्यांचेच पैसे बहिणींच्या खात्यात टाकतोय, तर बहिणींना लाचखोर म्हणायचा अधिकार आहे का?