ॲड. शिवूरकर यांनी म्हटले की, दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला २५ डिसेंबर रोजी एक महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने केलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत, शेतमालाला हमी भाव द्यावा, आदी मागण्यांसाठी कडाक्याच्या थंडीत हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान ३३ शेतकऱ्यांचा प्राण गेला. तरीही सरकार आपली भूमिका बदलायला तयार नाही. मोदी सरकारला शेतकऱ्यांपेक्षा अदानी, अंबानी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित महत्त्वाचे वाटते. आंदोलक आणि देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असताना आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आंदोलनाची बदनामी करीत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये भरण्याचे नाटक करून धूळफेक करीत आहे.
सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावेळी टाळ्या आणि थाळ्या वाजवून विरोध करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने घेतला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून संगमनेर तालुक्यात ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू असताना शेतकरी बंधू-भगिनींनी आणि आंदोलन समर्थकांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून विरोध करावा, असे आवाहन किसान संघर्ष समितीचे संगमनेर तालुक्याचे संयोजक शिवाजी गायकवाड, सहसंयोजक अनिल गुंजाळ, अनिल कढणे, शांताराम गोसावी, ज्ञानेश्वर राक्षे, इंदुमती घुले, दशरथ हासे, ॲड. अनिल शिंदे, अशोक डुबे आदींनी केले आहे.