अहमदनगर : अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात तथागत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन करत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.या आंदोलनात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला त्वरित अटक करू नये, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी अशा स्वरूपाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आम्ही न्यायालयाचा आदर करतो मात्र या निर्णयामुळे दलितांवर अत्याचाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. राज्य व देशात गेल्या २० वर्षात किती गुन्हे अॅट्रॉसिटीतंर्गत दाखल झाले, यामध्ये किती गुन्ह्यांचा निकाल लागला व किती गुन्हे खोटे निघाले याची श्वेतपत्रिका काढावी. यातून सत्य बाहेर येईल. भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता प्रस्थापित करण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याची तरतूद केली आहे. दलितांसाठी असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अर्धनग्न होऊन गळ्यात मडके व हातात झाडू घेऊन यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.या आंदोलनात सुशील म्हस्के, आशिष गायकवाड, तेजस गायकवाड, विनोद पाडळे, दीपक गायकवाड, हर्षद पेंढारकर, चेतन ढगे, सागर ढगे, मंगेश गायकवाड, हर्षद शिर्के, सुरेश काळे, महेश शेळके आदी सहभागी झाले होते.
नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अॅट्रॉसिटीसाठी कार्यकर्त्यांचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 4:40 PM