अहमदनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या उमेदवारीची मागणी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी पत्रकारांशी बोलताना केली़ या मतदारसंघातून रोहित पवार यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत़ मात्र, परहर यांच्या मागणीने पवारांच्या उमेदवारीलाच राष्ट्रवादीतून विरोधाचा सूर उमटू लागल्याचे दिसत आहे़कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित पवार गेल्या दोन वर्षांपासून विविध कामे करीत आहेत़ लोकांच्या समस्या सोडवित आहेत़ जेथे पालकमंत्री राम शिंदे पोहोचू शकले नाहीत, तेथे पवार पोहोचले आहेत़ पवार यांचेमुळे तरुणांची मोठी फळी मतदारसंघात राष्ट्रवादीशी जोडली आहे़ त्यामुळे पवार यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती़ त्यावर पवार यांनी ‘तुझी मागणी मान्य झाली’ असे उत्तर दिले होते़ त्यामुळे रोहित पवारच या मतदारसंघातील उमेदवार असतील, असे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत़ मात्र, गुरुवारी जिल्हा परिषदेत परहर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंजुषा गुंड यांच्या उमेदवारीची मागणी केली़यावेळी बोलताना परहर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून रोहित पवार मतदारसंघात विविध कामे करीत आहेत़ त्याचा फायदा आम्हाला होईल़ मंजुषा गुंड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम केले आहे़ त्यामुळे त्या सहज निवडून येतील़ या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे़ काँगे्रसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नसून, पंचायत समितीतही त्यांचे उमेदवार निवडून आलेले नाहीत़ त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे़ त्यामुळे गुंड यांनाच उमेदवारी मिळावी, असे ते म्हणाले़जिल्ह्यात ९ जागांवर राष्ट्रवादी लढणारपरहर यांनी गुंड यांच्या उमेदवारीची मागणी केली म्हणजे पवार यांच्या उमेदवारीला विरोध होतो, असे नाही़ उमेदवारीची मागणी कोणीही करु शकतो़ पवार यांचीही उमेदवारी अजून जाहीर नाही़ कर्जत-जामखेड हा मतदारसंघ काँगे्रसकडे आहे़ परंतु, या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्यामुळे आम्ही या मतदारसंघावर दावा सांगणार आहोत़ याशिवाय जिल्ह्यातील इतर ९ जागांवर राष्ट्रवादी लढणार आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
रोहित पवारांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:45 AM