महाराष्ट्र शासनाने ५ एप्रिलपासून राज्यातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, परंतु कोरोना महामारी सलून दुकानातूनच पसरते, हा शासनाचा समज पूर्णपणे चुकीचा आहे. शासनाच्या बससेवा, सरकारी आस्थापना कमी-अधिक प्रमाणात चालू आहेत, परंतु नाभिक समाजाचे सलून दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने समाजबांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मागील लाॅकडाऊनच्या काळात सलून दुकाने अनेक महिने बंद करण्यास भाग पाडले होते. लाॅकडाऊनच्या काळात वीजबिल, गाळा भाडे, कर्जाचे हप्ते, मुलांचे शैक्षणिक शुल्क, घरपट्टी, पाणीपट्टी यापैकी काहीही माफ केले नाही. समाजात अशी दडपशाही करून देशोधडीला लावले. कोरोना महामारीची पुन्हा भीती दाखवून सलून दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. हा नाभिक समाजावर अन्याय आहे. हा अन्याय फक्त नाभिक समाजावरच केला जातो, अशी नाभिक समाजाची भावना आहे.
आमच्या विनंतीचा विचार करून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी आवश्यक असलेली काळजी, नियमानुसार अटी व शर्तीचे आम्ही काटेकोर पालन करू, असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब बिडवे, किशोर दुधाडे, माधव बिडवे, सुनील कोरडे, महेश कोरडे, पप्पू कोरडे, शशिकांत बिडवे, शरद मदने, कल्याण राऊत, मधुकर थोरात, अभिजीत कदम, बाळासाहेब चौधरी, प्रसाद कोरडे, अशोक पवळ, ललित दुधाडे, सागर दळवी, आकाश कोरडे, कृष्णा सोनुले, अनिल थोरात आदींच्या सह्या आहेत.