अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा विचार न करता सर्वसाधारण सभेत कायम ठेव वाढवण्याचा पोटनियम दुरूस्तीचा विषय घेतला आहे. हा निर्णय तुघलकी निर्णय असून रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या विषयाला विरोध करण्याचे आवाहन सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पिंपळे यांनी केले आहे. रविवारी बँकेची ९७ वी सर्वसाधारण सभा होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात सर्व कारभार सदिच्छा मंडळाचा आहे. यात केवळ १७ दिवसांचा वाटा गुरूमाउली मंडळाचा आहे. सदिच्छा मंडळाच्या सभासदाभिमुख कारभाराला लेखा परीक्षणात ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. सत्ताधारी गुरूमाउली मंडळाने सत्तेत आल्याबरोबर बाहेरील मुदत ठेवींचा व्याजदर १ टक्क्यांनी कमी केला. यामुळे बाहेरील ठेवीचा ओघ मंदावला. यामुळे पोटनियम दुरूस्तीस टाकून ठेवी वाढवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. मात्र, शिक्षक सभासदांचा मोठा तोटा होणार आहे. निवडणूक काळात मोठ-मोठी आश्वासने दिलेल्या गुरुमाउली मंडळाने सभासदांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याचा आरोप राजेंद्र शिंदे यांनी केला आहे. हा पोटनियम मंजूर झाल्यास नवीन शिक्षक सभासदांना त्यांचे आर्थिक गणित बसवता येणार नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. डीसीपीएस धारक शिक्षकांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन शिंदे, पिंपळे, अनिल आंधळे, उध्दव मरकड, सुभाष खेडकर, माधव हासे, गजानन ढवळे, बाबा आव्हाड यांनी केले आहे.
सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाला शिक्षक सभासदांचा विरोध
By admin | Published: August 25, 2016 11:33 PM