विशेष मुलाखत / साहेबराव नरसाळे । अहमदनगर : कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर उपचार असले तरी जगातील गंभीर आजारांमध्ये कॅन्सरचा समावेश होतो. अशा कॅन्सर आजाराने तरुणांना मोठ्या प्रमाणात घेरल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण रुग्णांच्या टक्केवारीत जवळपास ४३ टक्के रुग्ण तरुण आढळून येतात. यात तंबाखूमुळे होणा-या कर्करोगाचे प्रमाण ४१़५ टक्क्यांपर्यंत असल्याचे डॉ़. रत्ना चव्हाण- नजन सांगतात. प्रश्न : तंबाखू हेच मौखिक कर्करोगाला कारण ठरते का? उत्तर : कर्करोगाचे विविध प्रकार पडतात. त्यातील मौखिक कर्करोग हा अधिक गंभीर मानला जातो़. त्याचे कारण मौखिक कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो आणि त्याचेच प्रमाण अधिक आहे़. त्यामुळे भारतात तरी ही समस्या अधिक गंभीर आहे. ४१़५ टक्के कर्करोग हा तंबाखूमुळे होतो़. म्हणजे जे कोणी म्हणत असतात ना की तंबाखूमुळे कर्करोग होत नाही, त्यांनी ही आकडेवारी गांभीर्याने पहायला हवी़. या आकडेवारीवरुन तरी तंबाखू हेच मौखिक कर्करोगाला कारणीभूत ठरत आहे, असे दिसते़. प्रश्न : मौखिक कर्करोगाची कारणे काय आहेत? उत्तर : तंबाखू, कात, पान मसाला, गुटखा, धुम्रपान, रासायनिक पदार्थांचे अतिरिक्त सेवन ही मौखिक कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. तोंडातील चट्ट्यांच्या प्रकारावरुन मौखिक कर्करोगाचे निदान करता येते़. तोंडामध्ये ज्या ठिकाणी तंबाखू ठेवली जाते, तेथे हा चट्टा आढळतो. त्याला ल्युकोप्लेकिया असं संबोधतात. गडद लाल रंगाचा वेलवेटसारखा चट्ट्याला इरिथोप्लेकिया म्हणतात. काही चट्टे सफेद, समांतर रेषांसारखे दिसतात. तोंडात चट्टे आल्यानंतर तिखट, मसालेदार पदार्थ सहन न होणे, तोंडाचा दाह होणे, जीभ व टाळूवर फोड येणे, तोंडाची लवचिकता कमी होणे, गालाच्या आतील बाजूला पांढरट, जाडसर पट्टे बनतात. यामुळे तोंड पूर्णपणे उघडत नाही. कृत्रिम रंगही कॅन्सरला कारक ?आज अनेकजण अन्नाला विशिष्ट रंग यावा, यासाठी कृत्रिम रंग वापरले जातात. हा कृत्रिम रंगही तोंडाच्या कॅन्सरला निमंत्रण ठरु शकतो. त्याशिवाय रासायनिक घटक असलेले पदार्थ, शीतपेये, फास्टफूड, प्लास्टिक पॅकेटमधील पदार्थ खाणे टाळले पाहिजे़. उपाय काय ?मौखिक कर्करोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा़ प्राथमिक चाचण्या, बायोप्सी, लॅब टेस्ट करुन घ्या. कॅन्सरचे निदान झाल्यास पुढील उपचार सुरु करता येतात. दिवसात २-३ लिटर पाणी प्यावे़. भरपूर फळे, पालेभाज्या खाव्यात व व्यायाम करावा. जेवणाच्या वेळा पाळाव्यात़ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळावे़.
तंबाखूमुळे तरुणांना घेरलंय तोंडाच्या कॅन्सरने; रुग्णांच्या टक्केवारीत ४३ टक्के रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:29 PM