- अशोक पवार (करंजी, जि.नगर)
शेती हा एक व्यवसाय असून, यात आपल्याला नफा मिळाला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्रिभुवनवाडी (ता.पाथर्डी) येथील हरिभाऊ पाटीलबा कारखेले यांनी आपल्या २ एकर शेतीत संत्र्यांच्या २०० झाडांची लागवड केली. विहिरीला पाणी कमी असल्याने संत्र्याच्या झाडांना ठिबकद्वारे पाणी देण्याची सोय केली. पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे दुष्काळ असूनही त्यांनी दुष्काळावर मात करून संत्र्याच्या पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. पहिल्या तीन वर्षांत या झाडापासून उत्पन्न मिळाले नाही; परंतु तीन वर्षांनंतर झाडांना फळे येण्यास सुरुवात झाली.
सुरुवातीच्या काळात ७०-८० हजार रुपयांपर्यंत त्यांना या बागेतून उत्पन्न मिळाले; परंतु बाग व झाडे मोठी होत गेली तशी त्यांना अधिक फळे येऊ लागली. अधिक उत्पन्न येऊन त्यांनी या बागेतून लाखो रुपये कमावले. आज त्यांच्या एका संत्र्याच्या झाडास कमीत-कमी १० कॅ रेट फळे आली आहेत. वयाच्या ६५ व्या वर्षी रात्रं-दिवस बागेची निगा राखण्याच्या कामात हरिभाऊ व त्यांच्या पत्नी साळूबाई, तसेच मुलगा रघुराज व मुलगी संगीता सतीश आव्हाड मदत करतात.
संत्र्याच्या बागेविषयी माहिती सांगताना हरिभाऊ कारखेले म्हणाले, झाडातील अंतर थोडे जास्त ठेवले. झाडाला फळे आल्यानंतर झाडांच्या फांद्यांची काळजी घेऊन बांधणी केली. संत्रा फळांना माशी लागू नये म्हणून औषधांची फवारणी केली. पूर्वी मी व्यवसाय करीत होतो. त्यातूनच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मी शेती केल्याने मला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले. पुढील वर्षी संत्रा बागेतून आणखी उत्पन्न वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
मी शेती करण्याच्या अगोदर हॉटेल, तसेच किराणा दुकान चालवीत होतो. त्यामुळे आपण काम करीत असलेल्या धंद्यात नफा मिळाला पाहिजे, हा दृष्टिकोन मी शेती करतानाही डोळ्यासमोर ठेवला. अतिशय ओसाड व पडीक जमिनीत मी पैसे गुंतवून जमिनीची मशागत केली. शेतीत घातलेले पैसे वायाला जात नाहीत. कधी-तरी ते वसूल होतील या आशेने या जमिनीत संत्र्यांची २०० झाडे लावली. तीन वर्षांनंतर मला त्याचे फळ मिळू लागल्याचेही ६५ वर्षीय शेतकरी हरिभाऊ कारखेले यांनी यावेळी सांगितले.
जिद्द, मेहनत आणि इच्छा असली तर शेतकरी दुष्काळावरही मात करूशकतात, हे वयाच्या ६५ व्या वर्षी त्रिभुवनवाडी येथील शेतकरी कारखेले यांनी दाखवून देऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला. अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कारखेले यांनी केलेल्या उपक्रमाची दखल घेऊन आपणही असेच काहीतरी वेगळे करून दाखविले पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे. केवळ नशिबाला, निसर्गाला दोष देत कपाळावर हात मारण्यापेक्षा शेतकऱ्यांनी वेगळा उपक्रम राबविल्यास शेती तोट्याची नव्हे, तर फायद्याचीच ठरणार आहे