लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून, बुधवारी दिवसभरात अमरधाम येथे ४२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. दररोज दोन हजाराहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी नगर शहरात दाखल होत आहेत. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून गंभीर रुग्ण दाखल होत असून, दररोज ४० ते ४५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागत आहे. वाढत्या मृत्यू संख्येमुळे उपाययोजना कमी पडत आहेत. मनपाच्या विद्युत दाहिनीमध्ये २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. उर्वरित मृतदेहांवर ओट्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. संंपूर्ण जिल्ह्यासाठी एकच स्मशानभूमी असल्याने तेथील यंत्रणेवरही ताण आला आहे.
.....
मनपाकडून आणखी शववाहिका
जिल्हा शासकीय रुग्णालयातून मृतदेह अमरधाम येथे आणण्यासाठी एकच शववाहिका होती. एका शववाहिकेत ५ ते ६ मृतदेह आणले जात आहेत. मृत्यू संख्या वाढल्याने मनपा आयुक्त शंकर गाेरे यांनी शववाहिका भाडेतत्वावर घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आरोग्य विभागाने आणखी एक शववाहिका उपलब्ध करून दिली आहे.