अहमदनगर : मोहटा देवस्थानची चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश शुक्रवारी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिला आहे. देवस्थानच्या चौकशीला यापूर्वी नगरच्या धर्मादाय उपायुक्तांनी स्थगिती दिली होती.विश्वस्तांच्या कारभाराविरोधात तक्रारींसंदर्भात धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, औरंगाबाद खंडपीठातील जनहित याचिका व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा हवाला देत नगरच्या धर्मादाय उपायुक्तांनी ही चौकशी १२ जुलैला स्थगित केली होती. चौकशी स्थगित करण्याबाबत वरिष्ठांशी ११ जुलैला रात्री दहा वाजता चर्चा झाली, असे उपायुक्तांनी आदेशात लेखी म्हटले होते.आदेशासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. देवस्थानचे माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही केली होती. या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानची चौकशी सुरूकरण्याचा आदेश दिला आहे.देवस्थानने मंदिरात सुमारे १ किलो ८९० ग्रॅम सोन्याची सुवर्णयंत्रे पुरल्याप्रकरणी ‘लोकमत’ने जानेवारी महिन्यात बातमी दिली होती. त्यानंतर विधिमंडळात आमदार नीलम गोºहे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन प्रभारी धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानच्या चौकशीचा आदेश दिला होता. माजी विश्वस्त नामदेव गरड यांनीही तक्रारी विधी राज्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत. त्यांचीही चौकशी सुरू आहे. तसेच तत्पूर्वीचीही चौकशीची प्रकरणे प्रलंबित आहेत. मोहटा देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
मोहटा देवस्थानची चौकशी करा,धर्मादाय आयुक्तांचा आदेश; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:19 AM