अहमदनगर : निवडणुकीसंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना (बीएलओ) सोपवलेले काम घेण्यास नकार देणाºया सात शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक शाखेने प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले आहेत.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अद्ययावत मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी निवडणूक शाखेने जिल्ह्यातील काही शिक्षक, तसेच इतर विभागांतील सरकारी अधिका-यांना बीएलओ म्हणून नेमले आहे. सुरूवातीला बीएलओचे कामकाज करण्यास काही शिक्षकांनी टाळाटाळ केली. परंतु निवडणूक शाखेने कडक पावले उचलल्याने हे शिक्षक पुन्हा कामावर रुजू झाले. तरीही नगर तालुक्यातील काही शिक्षकांनी बीएलओ कामास नकार दिला. शेख रमजान खुदबुद्दीन (जि.प. शाळा सारोळा कासार), मेघा रासकर (सारोळा कासार), संजय शेळके (खंडाळा), सुप्रिया देशमुख (कर्जुनेखारे), रेणुका खेडकर (विळद), जे. डी. करांडे (चिचोंडी पाटील) व जालिंदर बोरुडे (भातोडी पारगाव) या सात शिक्षकांनी हे काम घेण्यास नकार दिल्याने या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश निवडणूक शाखेने प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले. या शिक्षकांना बीएलओ कामाचा आदेश बजवावा, या कामात त्यांनी हयगय केल्यास त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०चे कलम ३२ नुसार नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे या आदेशात म्हटले आहे.
शिक्षक संघटना हादरल्याहा आदेश येताच यातील काही शिक्षकांनी त्वरित बीएलओचे काम स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालय गाठले. बाकींवर शिक्षणाधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. मंगळवारी दिवसभर या कारवाईबाबत शिक्षक संघटनांमध्ये महसूल विभागाबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. व्हॉट्सअॅपवरून अनेक शिक्षक नेत्यांनी महसूलला योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ. फक्त शिक्षकांनी एकी ठेवावी, असे चिथावणीखोर मेसेज पाठवले जात होते. एकूणच या कारवाईमुळे शिक्षकांसह शिक्षक नेतेही हादरले आहेत.