अहमदनगर : जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत कार्यारंभ आदेशानंतर कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना नोटीसा देण्यात येणार आहेत. त्यानंतरही आठ दिवसात कामे सुरू न झाल्यास संबंधीत ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेत डॉ. कोल्हे यांनी शनिवारी लघु पाटबंधारे विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता एस. डी. मोरे आणि अभियंते उपस्थित होते. जिल्हा परिषदेकडील जलयुक्त शिवार योजनेची ८५ टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कामे सुरू न झालेल्या ठिकाणी ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वास्तवात संबंधीत कामाला कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ८ दिवसांत कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना नोटीस देण्यात यावी. त्यानंतर ८ दिवसांत काम सुरू न झाल्याास त्या कामाचा पंचनामा करून नव्याने कामाची टेंडर प्रक्रिया करण्यात यावी, त्या ठेकेदारांची कामाची अनामत रक्कम जप्त करून त्याला काळ्या यादीत टाकण्याचे कोल्हे यांनी आदेश दिले आहेत.
‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश
By admin | Published: June 26, 2016 12:31 AM