ढोरजळगाव : शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे चौदाव्या वित्त आयोगातून विकास कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत तत्कालीन सरपंच आसराबाई सोपान आव्हाड व ग्रामसेवक यांनी कर्तव्यात कसूर केली. त्यामुळे त्यांच्याकडून ३ लाख ६३ हजार ११७ रुपये समप्रमाणात वसुली करावी अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे. हा आदेश शेवगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना दिला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, वडुले खुर्द गावच्या तत्कालीन सरपंच आसराबाई सोपान आव्हाड यांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १४ वा वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी स्ट्रिट लाईट खरेदीकरीता २ लाख ७४ हजार४०० रुपये इतका खर्च करण्यात आला. सदरचा खर्च मासिक सभेत नामंजूर करण्यात आले. खरेदी करताना ग्रामपंचायतचे अंदाज पत्रक घेतले नाही. १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत स्पर्धा परीक्षा पुस्तके व फर्निचर खरेदी करीता अनुक्रमे ४५ हजार ५०७ आणि ४३ हजार ६१० रुपये आवश्यक नसतानाही खर्च करुन गंभीर स्वरूपाचे अनियमितता केल्याचे सिद्ध झाले आहे. ३ लाख ६३ हजार ११७ रुपये रक्कम तत्कालीन सरपंच आसराबाई सोपान आव्हाड व ग्रामसेवक यांच्याकडून समप्रमाणात वसूल करण्याचे अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेवगावच्या गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.
वडुले खुर्दच्या सरपंच आणि ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 3:46 PM