बेलापूर : शहरातील मुख्य रस्ता आणि नगर रस्त्याला जोडणाऱ्या प्रस्तावित रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी ग्रामपंचायतीला दिले आहेत.
याकामी सिद्धीविनायक युवा मंचच्या वतीने शनिवारी अपर जिल्हाधिकारी संदीप जाधव यांना निवेदन देण्यात आले होते. मंचचे प्रमुख गोपाल जोशी यांना या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता अतिक्रमणमुक्त होऊन नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
शहरातील जामा मस्जिदच्या मागील बाजूचा हा रस्ता नगररचना विभागाने प्रस्तावित म्हणून दाखविला आहे. सध्या येथून वाहतूक सुरू असली तरी अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. २५ फुटांच्या या रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने दूर करून तो पूर्ववत करावा, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहेत.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. कारवाई करून तसा अहवाल मंचचे प्रमुख तसेच आपणाला द्यावेत, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
------------