अहमदनगर : सावेडी कचरा डेपो इतरत्र हालविण्यात आला आहे. मात्र कागदोपत्री कचरा डेपो दाखवून तिथे वृक्षलागवड करण्यास नुकताच कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. कचरा डेपो हलविल्यानंतर त्या जागेत हरितपट्टा विकसित करण्यामागे नेमका काय उद्देश आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील साठविलेल्या कचऱ्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मध्यंतरी राष्ट्रीय हरित लवादाने कचरा डेपोभोवती हरितपट्टा विकसित करण्याचा आदेश दिला. या आदेशाची अंमलबजावणी करीत महापालिकेने सन २०१७ मध्ये निविदा प्रसिद्ध केल्या. त्यास प्रतिसादही मिळाला. तीन वर्षांपूर्वी पालिकेचे दोन कचरा डेपो अस्तित्वात होते. यामध्ये बुरुडगाव व सावेडी, अशा दोन कचरा डेपोंचा समावेश आहे. या दोन्ही कचरा डेपोंमध्ये हरितपट्टा विकसित करण्यासाठी ए. जी. वाबळे यांना काम देण्यात आले. त्यांना कार्यारंभ आदेशही दिला गेला. दरम्यान, सावेडी कचरा डेपो बंद केला गेला. हा कचरा डेपो बंद होऊन सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला. स्थायी समितीच्या सभेत गणेश भोसले यांनी कचरा डेपोतील हरितपट्टा विकसित करण्याचे काम कुठपर्यंत आले, असा प्रश्न केला. त्यामुळे महापालिकेला जाग आली. उद्यान विभागाने बुरुडगाव व सावेडी, अशा दोन्ही कचरा डेपोंमध्ये हरितपट्टा विकसित करण्यास पूर्वीच्याच ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला. हा आदेश देईपर्यंत सावेडी कचरा डेपो बंद झालेला होता, असे असतानाही कार्यारंभ आदेश दिला गेल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.
ठेकेदाराने बुरुडगाव येथील कचरा डेपोच्या संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने झाडे लावली; परंतु, ही रोपे छोटी दोन ते तीन फुटांची आहेत. या कामाचे बिल ठेकेदाराला दिले केले गेले. या कामाबाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. असे असताना त्याच ठेकेदाराला सावेडी कचरा डेपोत आणि ते बंद झालेल्या कचरा डेपोत रोपे लावण्याचे काम देऊन उद्यान विभागाला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
....
- सावेडी कचरा डेपो बंद झालेला आहे. हे काम पूर्वीच मंजूर झालेले आहे. याबाबतची कार्यवाही उद्यान विभागाकडून केली जात असल्याने याबाबत सांगता येणार नाही.
- किरण देशमुख, स्वच्छता निरीक्षक
...
तीन वर्षांपूर्वीची दिला होता कार्यारंभ आदेश
शासनाच्या १४ व्या वित्त अयोग निधीतून सावेडी कचरा डेपोत हरितपट्टा विकसित करण्याबाबत सन २०१६-१६ या अर्थिक वर्षात १५४९ या क्रमांकाची ऑनलाईन निविदा प्रसिद्धद करण्यात आली होती. तीन वर्षांनंतर याच ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला गेला आहे.
..
वृक्ष लागवडीचे नियम
- रोपांची उंची पाच फूट असावी. रोपांचे वय किमान तीन वर्षे असावे.
- आग, वणव्यापासून काळजी घ्यावी.
- भारतीय जातींची झाडे लावणे.
- उंबर, पिंपळ, चिंच, कडूलिंब, करंज, शिरस, जांभूळ ही झाडे लावावीत.
.....