अहमदनगर/अस्तगाव : कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय न करता व सरकारी नियमात अकोले तालुक्यातील कालवे सुरू करण्याचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त देण्याचीही तयारी जिल्हाधिका-यांनी दर्शविली.निळवंडे कालव्यांच्या कामातील समस्या व अडचणीबाबत बुधवारी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व विभाग प्रमुखांसह निळवंडे कृती समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कालव्याला येणा-या अडचणी खासदार व जिल्हाधिका-यांनी समजून घेतल्या.निळवंडे कालव्यांचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. जे थोडेफार राहिले असेल, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. ज्या ठेकेदाराची काम करण्याची मानसिकता नसेल, त्या ठेकेदाराचा ठेका नूतनीकरण करू नये, अशा सूचना खा. लोखंडे यांनी दिल्या. जर सर्व अधिका-यांनी आपआपली कामे चोख पार पाडली तर, कालव्यांसाठी कोणतीच समस्या येणार नसल्याचेही खा. लोखंडे यांनी सांगितले. त्यामुळे कालव्यात जो काही अडथळा असेल तो लवकर दूर करण्याची तयारी सर्वच अधिका-यांनी दाखविली.बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्यासह संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, पाटबंधारे विभाग, उर्ध्व प्रवरा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नगररचना सहायक संचालक, लघु पाटबंधारे विभागाचे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आदी अधिका-यांसह निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, सुखलाल गांगवे, राजेंद्र सोनवणे यावेळी उपस्थित होते.अकोले तालुक्यातील कामे सुरू करण्यासाठी एका विभागाने दुस-या विभागाकडे बोट दाखवू नये. संबंधित विभागाच्या कामांच्या जबाबदा-या निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलाविली होती. बैठकीचे फलित हे सकारात्मक निघेल.- सदाशिव लोखंडे, खासदार.कालव्यांची संपादित जमीन ही सरकारच्या नावावर आहे. कोणत्याही अडचणीचा विचार न करता संबंधित अधिका-यांनी नियमात काम करावे. शेतक-यांना लवकर कसे पाणी मिळेल, याचा विचार करावा.- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी.
‘निळवंडे’चे काम सुरू करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:03 PM