संतोष थोरात
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रामहरी ढेरे या शेतकऱ्याने सेंद्रिय पध्दतीने १५ गुंठ्यात मिरची पिकात टरबूज आंतरपीक घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.सेंद्रिय शेती करून मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक घेऊन खर्च वजा जाता पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. मल्चिंग पद्धतीने ठिबकद्वारे मिरचीची रोपे लावून लागवड केली. परंतु मिरची फळ लागवड सुरु झाली की, जमिनीवर लगडलेली झुमके लोंबकळतात. जमिनीचा संपर्क आल्यावर ते खराब होऊन बाजारात विक्रीसाठी कमी दराने विकावे लागतात. यात शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशील रामहरी ढेरे व पत्नी वनिता ढेरे यांनी मिरची पिकात टरबूज पिकाची लागवड केली.मशागतीची तयारी म्हणून दहा हजारांचे शेणखत टाकून मशागत केली. पाटसांगवी जिल्हा उस्मानाबाद येथून तीन हजारात बाराशे मिरची रोपे आणली. त्यातच तीन हजारांचे टरबूज रोपे लागवड केली. ९० टक्के सेंद्रिय पद्धतीने १० टक्के रासायनिक खते टाकली. फवारणी औषधे वापर करून लागवड केलेल्या टरबुजाचे दहा टन उत्पादन काढून ४० दिवसात टरबूज पिकातून एक लाख आठ हजार रुपये तर मिरचीचे ४ टन पिकातून एक लाख दहा हजार एवढे उत्पादन काढले. ४५ हजार रुपयांच्या उत्पादन खर्चातून जवळपास पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न आंतरपिकात दुहेरी पीक घेऊन मोठे ढेरे यांनी मिळविले आहे.शेती पीक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतले तर चांगले उत्पादन कमी जमिनीत मिळवता येते. जवळ बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे मुंबई येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन जावे लागते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याने त्याचा उत्पादन वाढीवर परिणाम होतो, असे ढेरे यांनी सांगितले.