घारगाव (अहमदनगर) - राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी आहे. असं असतानाही संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर शिवारात देवी मंदिरासमोर कोरोना नियमांना हरताळ फासत जमाव जमवून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस आल्याचा सुगावा लागताच आयोजकांसह प्रेक्षकांनीही पळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून सत्तेचाळीस जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन बैलाच्या जोडीसह सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी व शर्यतीवरील बंदीचे नियम धाब्यावर बसवून कौठे मलकापूर देवी मंदिरासमोर (गट न.१२९) बैलगाडा शर्यत घेण्यात आली. या शर्यतीची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत,पोलीस हवालदार सुरेश टकले,दशरथ वायाळ,विशाल कर्पे यांनी कौठे मलकापुर येथे धाव घेतली. पोलीस आल्याचा सुगावा लागताच शर्यत पाहण्यासाठी आलेल्यांनी तेथून पोबारा केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिकअप (क्रमांक.एम.एच.१४.एफ.टी.०७००) दोन बैलांची जोड, बैलगाडा शर्यतीचा छकडा,बैलाला पळविण्याकरिता टोचण्यासाठी खिळा असलेली पातळ बांबूची काठी असा सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नितीन उत्तम पावडे (वय-३८,रा.पाचघर ता.जुन्नर,जि.पुणे), नितीन उत्तम धोंडकर (वय-२२, रा.पाचघर ता.जुन्नर,जि.पुणे)अक्षय बबन डुबरे (वय-२६,रा.ओतुर राज लॉन्स), श्रीकांत बाळु मंडलीक ( वय२७ वर्षे,रा.डिंगोर ,ता.जुन्नर जि.पुणे), शिवाजी रामभाऊ कारंडे (वय-५३), सचिन उत्तम पानसरे (वय-२६ वर्षे,रा.ओतुर ता.जुन्नर जि.पुणे) या सहा जणांना ताब्यात घेतले.
याबाबत शर्यत आयोजित करणाऱ्या शिवाजी कारंडे यांना पोलिसांनी अधिक माहिती विचारली असता बैलगाडा शर्यत आयोजक लक्ष्मण गजाबा गिते (रा.कौठे मलकापूर ता.संगमनेर), राकेश खैरे सुरेश लक्ष्मण चितळकर (चितकळ वस्ती,साकुर ता.संगमनेर), बाळासाहेब बबन महाकाळ(रा.मांदारणे,ता.जुन्नर जि.पुणे), राहुल काळे (पाचघर रोड,ओतुर),संजय भागा देवकाते (रा.चितळकर वस्ती,साकुर ता.संगमनेर), चैतन्य पडवळ (रा.ओतुर राज लॉन्स), सतीश गिरजू खेमनर(रा.बिरेवाडी), भाऊसाहेब आबु खेमनर (रा.हिरेवाडी), दादासाहेब चिमाजी खेमनर (रा.हिरेवाडी), विशाल सगाजी खेमनर (रा.नान्नर वस्ती), शुभम शंकर नान्नर (रा.नान्नर वस्ती), अमोल साहेबराव नान्नर (नान्नरवस्ती),बाळु साहेबराव कुदनर (शिंदोडी), प्रतिक संतोष ठोंबरे (रा.जांबुत), राहुल गंभीरे (रा.कौठेमलकापुर ता.संगमनेर) यांसह इतर २०ते२५ हे फरार असून त्यांच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन दोन हजार रुपये टोकन लावून करण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहेत.