चिचोंडी पाटील : महावितरणकडून नगर तालुक्यातील जनतेची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक ८ दिवसांच्या आत थांबवावी, अन्यथा भाजप नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी गुरुवारी दिले.
कोकाटे म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांपासून महावितरण विभागाने कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून अडवणूक चालविली आहे. एखादे रोहित्र जळाले की शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरा तरच ते बदलून दिले जाईल, असे सांगून अडकवून ठेवले जाते. कोरोनासारख्या परिस्थितीमध्येही सर्व आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असताना महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.
सांडवा, पिंपळगाव लांडगा, जेऊर परिसरातील रोहित गेल्या २-३ महिन्यांपासून जळालेले असतानाही अद्यापपर्यंत ते बदलून भेटलेले नाहीत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. भाजप नगर तालुक्याच्या वतीने याबाबत अनेक वेळा निवेदन दिलेले आहे. परंतु, महावितरणने गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळेच येत्या ८ दिवसात महावितरणने तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून होत असलेली अडवणूक थांबवावी. अन्यथा, भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कोकाटे यांनी दिला.
यावेळी ज्येष्ठ नेते रभाजी सूळ, दरेवाडीचे सरपंच सुभाष बेरड, दशमीगव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे, तालुका सरचिटणीस गणेश भालसिंग, बापूसाहेब बेरड, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, राजेंद्र दारकुंडे, पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, विजय गाडे, भाऊसाहेब बेल्हेकर, संतोष कोकाटे, बापूसाहेब कोकाटे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
190821\img-20210819-wa0155.jpg
नगर तालुक्यातील वीज्र समस्या निवारण करा अन्यथा आसुड मोर्चा चा इशार भाजपा तालुका ने दिला