कोपरगाव : येथील नगरपरिषदेत काळे गटाने २८ कामांस कोल्हे गटाच्या भाजप-शिवसेना नगरसेवकांच्या विरोधाचा बागुलबुवा दाखविला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करून याबाबत राजकारण सुरू ठेवले आहे. मात्र, ही बाब नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शहर विकासासाठी सर्व पक्षांनी साथ द्यावी, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही आमची बाजू त्यांच्यापुढे मांडली आहे. सर्व सहमतीने त्यावर निर्णय व्हावा, असे भाजपचे पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
कोपरगाव भाजप कार्यालयात बुधवारी (दि.१५) भाजप-शिवसेना नगरसेवकांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेऊन २८ विकासकामांची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत भूमिका मांडली.
यावेळी संजय सातभाई, पराग संधान, शिवसेनेचे योगेश बागुल व माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले, २८ पैकी २२ कामांना आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र, उर्वरित सहा कामांमध्ये जनतेच्या पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होईल. अवास्तव अंदाजपत्रकीय रक्कम रद्द करून, वाचलेल्या पैशामध्ये शहरातील एस. जी. विद्यालय रोड, येवला रोड, गुरुद्वारा रोड, आंबेडकर स्मारक ते संभाजी पुतळा रोड व संभाजी पुतळा ते निवारा कॉर्नर रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, अशी आमची भूमिका आहे. पालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ कोल्हे गटाला बदनाम करण्यासाठी झारीतले शुक्राचार्य काम करीत आहेत. या कामासंदर्भात सर्वसंमतीने पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा बोलावून एक मताने निर्णय व्हावा, म्हणून फेब्रुवारीपासून आम्ही मागणी करत होतो. परंतु, आमची ही मागणी बाजूला ठेवून केवळ आणि केवळ कोल्हे गट विकास कामे होऊ देत नाही. हे चित्र शहरवासीयावर बिंबविण्याचे कट - कारस्थान काळे गटाच्या नगरसेवकांनी सुरू ठेवले आहे.
ही बाब नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मंगळवारी याबाबत ठोस भूमिका घेत बाजू मांडली व शहर विकासाला सर्व पक्षांनी साथ देण्याची भूमिका आमच्या समोर घेतली. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याप्रसंगी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, विनोद राक्षे अतुल काले, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, नगरसेवक शिवाजी खांडेकर, वैभव गिरमे, पप्पू पडियार, रवी रोहमारे, दीपक जपे उपस्थित होते.