सामाजिक बांधिलकी जपत पोहेगाव नागरी पतसंस्था पोहेगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील रुग्णांसाठी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील रुग्णांनी उपचार घेतला आहे. लोकसहभागातून सामाजिक बांधिलकी राखत सुरू केलेल्या या कोविड सेंटरमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. पोहेगाव परिसरात सुरू झालेल्या या कोविड सेंटरची माहिती मुंबई येथील सायन हॉस्पिटलचे डॉ. राहुल दत्तात्रय गुडघे यांना समजली. मूळचे सोनेवाडी येथील रहिवासी असलेले डॉ. गुडघे यांनी स्वतः वेळ काढत पोहेगाव कोविड सेंटरला भेट दिली. कोविड रुग्णांशी संवाद साधत रुग्णांना धीर देत अकरा हजार रुपयांची मदतही त्यांनी नितीन औताडे यांच्याकडे सुपूर्त केली.
डॉ. सुनील मेहेत्रे, डॉ. जगदीश झंवर, डॉ. नितीन गवळी, डॉ. उषा गवळी, डॉ. आनंद काळे, डॉ. घनश्याम गोडगे, डॉ. नरेंद्र होन, डॉ. रावसाहेब जावळे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे हे परिसरातील डॉक्टर कोविड सेंटरमधील रुग्णांना मोफत तपासणी व उपचारासाठी वेळ देत असतात. शिवसेना नेते नितीनराव औताडे, सरपंच अमोल औताडे, ग्रामविकास अधिकारी रामदास काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बडदे यांच्याशी संपर्क करत त्यांनी कोविड सेंटरमधील उपचारासाठी दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती आपल्याकडे घेतली.