संगमनेर : रस्त्यांवर अपघात होण्यास मानवी चूक सर्वात जास्त जबाबदार आहे. बऱ्याच वेळेला वाहनचालक थोडीशी जागा मिळाल्यानंतर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतात. अशा वेळेला समोरून येणाऱ्या वाहनचालकाला हे माहीत नसते. तसेच वेळेची बचत म्हणून चालकांकडून काही ठिकाणी शॉर्टकट्स वापर करण्यात येतो आहे. त्यामुळे चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, शाॅर्टकट्सचा वापर करणे असे प्रकार जीवघेणे ठरू शकतात.
वाहन चालवताना वेग हा रस्त्याची स्थिती, रहदारी व वाहनाची स्थिती लक्षात घेऊन मर्यादित ठेवावा. अती वेगाने वाहन चालवल्यास अपघात होण्याची शक्यता असते. संगमनेर शहरातून जुना नाशिक-पुणे महामार्ग, कोल्हार-घोटी राज्यमार्ग जातो. शहरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, वेळेची बचत व्हावी म्हणून शॉर्टकट्स वापर करणे हे प्रमाण येथे वाढले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महामार्ग पोलीस, संगमनेर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते.
शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक फलक गेल्या अनेक वर्षांपासून लावला आहे. त्यावर काही सूचना लिहिलेली आहे. ती पुसली गेली असून त्यावर ‘फक्त प्रवेश’ एवढेच लिहिलेले दिसते. बाह्यवळण महामार्ग झाल्याने शहरात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहेत. मात्र, वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणे. संगमनेर नगरपरिषदेचे वाहनतळ संदर्भात धोरण नसणे. सुमारे ३५ लाख रूपये खर्च करून शहरात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद असून त्यावरील दिवे देखील गायब आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या अजूनही सुटलेली दिसत नाही.
नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गाच्या उजव्या व डाव्या या दोन्ही बाजूस गावे आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्यांचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही वाहन चालकांकडून सर्व्हिस रस्त्यांचा वापर होत नाही. ते गावात जाण्यासाठी चुकीच्या पद्धतीने शॉर्टकट्स वापर करतात. त्यामुळे देखील छोटे-मोठे अपघात घडतात. शहरातून जाणारा जुना नाशिक-पुणे महामार्ग आणि नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग ज्या ठिकाणी एकत्र येतो, तेथे घुलेवाडी बायपास चौकात देखील वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने घेऊन जात असल्याने वाहनांची धडक होऊन यापूर्वी अपघात झाले आहेत.
-------------
सर्व्हिस रस्ता नसल्याने अपघात
संगमनेरातून अकोलेकडे जाताना नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरील उड्डाणपुलाखालून जावे लागते. बाह्यवळण महामार्गाने नाशिकच्या दिशेने वाहन घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना संगमनेर शहरात येण्यासाठी सर्व्हिस रस्ता आवश्यक आहे. मात्र, येथे सर्व्हिस रस्ता नसल्याने संगमनेर शहरात जाण्यासाठी वाहनचालकांना काही अंतर पुढे जाऊन डाव्या बाजूने वाहन घेऊन वळावे लागते. त्यामुळे नाशिकच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना पुढे वाहन वळत असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांची धडक होऊन येथे झालेल्या अपघातात काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
---------------
चुकीच्या दिशेने झालेले अपघात -२ (नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग)
मृत्यू - २
जखमी - २
चुकीच्या दिशेने दंड - साधारण ८० हजार रूपये
------------
संगमनेर तालुक्यात तीन ब्लॅक स्पॉट
एकाच ठिकाणी तीन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जीव गेला तर त्या जागेला ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणतात. चंदनापुरी घाट, सायखिंडी फाटा, घुलेवाडी बायपास चौक हे तीन ब्लॅक स्पॉट संगमनेर तालुक्यात आहेत. असे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी सांगितले.
-----------
प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाची प्राथमिक तपासणी करावी. वाहन चालविताना वेग मर्यादा पाळणे बंधनकारक आहे. ओव्हरटेक करणे टाळावे. रस्त्यांच्या कडेला लावलेला चिन्ह फलक तसेच माहितीपत्रक बघा आणि वाचा. नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावात जाण्यासाठी सर्व्हिस रस्ते आहेत. वाहन चालकांनी या रस्त्यांचा वापर करावा. शॉर्टकट्स वापर केल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
- भालचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक तथा डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्र प्रमुख