कोपरगाव : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाची कोरोना महामारीमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, उपचारासाठी ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये पुरेसे बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अशा आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत कोपरगाव तालुक्यात सहा आरोग्य केंद्र, एक नागरी आरोग्य केंद्र व बत्तीस आरोग्य उपकेंद्र आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा व शक्य असतील तितके जास्त व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कोल्हे यांनी निवेदनातून केली आहे. कोल्हे म्हणाले, सरासरी ५ हजार नागरिकांमागे एक उपकेंद्र असल्याने येथील स्टाफ व व्यवस्था वापरून रूग्ण तपासणी, तातडीचे उपचार व विलगीकरण शक्य होईल. तसेच ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स आदी सेवा उपलब्ध झाल्यास होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण होऊन नागरिकांची धावपळ कमी हाईल. अत्यावश्यक व गंभीर रूग्णांनाच तालुका आरोग्य केंद्र अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येण्याची गरज भासेल. त्यामुळे या विषयाकडे लक्ष देऊन लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.