अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडविताना प्रत्येक रुग्णालय ऑक्सिजनच्या सुविधेने स्वयंपूर्ण करण्याचा मानस केंद्रीय पर्यावरण तथा माहिती व तंत्रज्ञानमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. रुग्णालयातील बेडच्या संख्येनुसार ऑक्सिजन प्रकल्पाची सक्ती करण्याचा नियम सरकार लवकरच करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
नगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनमध्ये कार्यान्वित झालेल्या स्वयंपूर्ण ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते गुरुवारी व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून झाले. प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे, डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा. डॉ. सुजय विखे पाटील, जि.प. माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, विश्वस्त डॉ. सुप्रिया ढोकणे-विखे पाटील, ॲड. वसंतराव कापरे, सुभाष भदगले, लेफ्टनंट जनरल डॉ. बी. सदानंदा, डॉ. अभिजित दिवटे, तांत्रिक संचालक डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री जावडेकर म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या त्रुटी प्रामुख्याने दिसून आल्या, त्यामध्ये ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा ही समस्या सर्वांनाच भेडसावली. अनेक रुग्णालयांत ऑक्सिजन प्रकल्प नाहीत हे प्रामुख्याने जाणवले. त्यामुळेच ऑक्सिजनची उपलब्धता करणे हे मोठे आव्हान बनले.
संकटाच्या काळातही एक हजार टन ऑक्सिजनची उपलब्धता केली. यासाठी देशातील स्टिल उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनीही मोठी मदत केली असून पीएम केअर फंडातूनही आता ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. विखे पाटील फाउंडेशनने कार्यान्वित केलेला ऑक्सिजन प्रकल्पही एक चांगली सुरुवात असून, हा स्वयंपूर्ण प्रकल्प असल्याने टँकरची वाट पाहावी लागणार नाही. भविष्यात हॉस्पिटलमध्ये असलेल्या बेडच्या संख्येच्या प्रमाणात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा नियम सरकार करेल. देशात टंचाई निर्माण झाल्यानंतर परदेशातून ऑक्सिजन मागवावा लागला. कंटेनरची संख्याही कमी आहे; परंतु कुठेही कमी न पडता साधनांची उपलब्धता करून ऑक्सिजन पुरविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. विखे पाटील परिवाराने सेवेचे काम समजून हा प्रकल्प उभारण्याचा केलेल्या निर्णयाचे जावडेकर यांनी कौतुक केले.
इंदोरीकर महाराज म्हणाले की, काळाची गरज ओळखून विखे पाटील परिवार समाजासाठी काम करत असतो. सेवेची आनुवंशिकता ही त्यांच्या सर्व पिंढ्यांमध्ये पाहायला मिळते. कोविडच्या संकटात या परिवाराने जिल्ह्यासाठी खूप काही केले. या सेवेतच खरे समाधान आहे. कोविडच्या संकटाला घाबरून चालणार नाही. आत्मविश्वासानेच सामोरे जावे लागेल. या आत्मविश्वासातच आत्मिक समाधान आहे.
आ. राधाकृष्ण विखे म्हणाले, पद्मश्री डॉ. विखे पाटील आणि आदरणीय खा. बाळासाहेब विखे पाटील यांनी लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. मानवतेच्या कल्याणाचा त्यांनी रुजविलेला विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कोविड संकटात डॉ. विखे पाटील फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मोठी मदत करता आली. ऑक्सिजनचा प्रकल्प हा सेवेचाच एक भाग असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या धैर्याने या संकटातून देशाला सावरले. खा. डॉ. सुजय विखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---
फोटो- १० विखे ऑक्सिजन
नगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनमध्ये कार्यान्वित झालेल्या स्वयंपूर्ण ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते गुरुवारी व्हर्च्युअल रॅलीद्वारे झाले. यावेळी प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, शालिनी विखे पाटील, डॉ. सुप्रिया ढोकणे-विखे, ॲड. वसंतराव कापरे, सुभाष भदगले, लेफ्टनंट जनरल डॉ. बी. सदानंदा, डॉ. अभिजित दिवटे, डॉ. पांडुरंग गायकवाड आदी.