------------------
मराठी नामफलक आवश्यक
अहमदनगर : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणी झालेले न्यास हे त्यांचे नामफलक हे मराठी भाषेमध्ये लावत नाहीत. ते मराठी भाषेमध्ये लावणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व नोंदणीकृत न्यासांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या न्यासाचा नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागामध्ये लावावा. यासंदर्भात राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग आणि धर्मादाय आयुक्त, मुंबई यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाही करून आदेशाचे पालन करावे, असे आवाहन धर्मादाय उपायुक्त हि. का. शेळके यांनी केले आहे.
-----------
वारसदारांसाठी कर्ज योजना
अहमदनगर : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या मार्फत कोविड-१९ या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी कर्ज देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. या योजनेत प्रकल्प मूल्य १ लाख ते ४ लाख रुपयांपर्यंत असणे अपेक्षित आहे. त्यामध्ये केंद्राचा एन. एस. एफ. डी. सी. सहभाग ५० टक्के व भांडवली अनुदान २० टक्के असे आहे. व्याज दर ६ टक्के प्रमाणे असून, परतफेडीचा कालावधी ६ वर्षे आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे १५ जून २०२१पर्यंत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील कुटुंबातील व्यक्तीने माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांनी केले आहे.