- हेमंत आवारी (अकोले, जि. अहमदनगर)
तालुक्यातील बित्तमगड व विश्रामगड परिसरातील एकदरे आदिवासी पाड्यातील हैबत व हिराबाई भांगरे दाम्पत्याने शेती पंपासाठी ‘सौरऊर्जे’चा वापर करीत ऐन दुष्काळात भातशेती फुलवली. दुर्मिळ अशा ‘काळभात’ गावठी भात वाणाचे त्यांनी जतन केले आहे.‘बायफ’ संस्थेच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी विविध योजना राबावल्या जातात. पारंपरिक काळभात, जीरवेल, तांबडा रायभोग, वरंगळ, गरे व हाळी कोळपी, तामकुड, ढऊळ, खडक्या, आंबेमोहर, टाईचन आदी गावरान भात वाण व कडू-गोडा-येरंडी वाल, आबई, चवळी, मिरची, गवार, काटेभेंडी, भोपळा, घोसाळे, नागली, वरई, मसूर, हरभरा, खुरासणी, वाटाणा, घेवडा आदी गावठी वाण जतन संवर्धन करण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. जनरल मिल्स पुरस्कृत व बायफच्या उपक्रमांचा शेतकऱ्यांना फायदा होतो.
एकदरीतच हैबत व हिराबाई भांगरे या आदिवासी कुटुंबाची शेतीची बिकट वाट ‘बायफ’ने सुखकर केली. त्यांचा भात वाणाचा ‘बियाणे कोष’ परिसरात सुपरिचित आहे. १४ प्रकारचे पारंपरिक भात वाण त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या घरीच भात संशोधन केंद्र उभारले आहे. या संशोधन केंद्रास लहरी पावसाचा फटका नको म्हणून साडेचार लाख रुपये खर्चून सोलार पॅनल उभारून सौरऊर्जेवर चालणारा शेतीपंप बसविला आहे.
दुष्काळात साडेतीन ते चार एकर भात शेती डोळ्यासमोर गेली. दोन महिने पाऊस न पडल्याने अक्षरश: सुकून पिवळी होत चालली होती. बायफच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेतीपंपामुळे हे भात क्षेत्र वाचवता आले. १४ प्रकारचे पारंपरिक भाताचे वाण प्रात्यक्षिक घेतलेले आहे. ते वाचवता आलेले आहे. डिझेल इंजिनने शेतीला पाणी देणे अतिशय खर्चिक आहे. ४ तासांच्या भरणीसाठी अंदाजे हजार ते बाराशे रुपये खर्च येतो, असे हैबत भांगरे सांगतात.
घटते पर्जन्यमान, निसर्गात होणारे बदल, बेभरवशाचा पाऊस या सर्वांचा विचार केल्यास अशी परस्थिती वारंवार येऊ शकते, याचा विचार करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत मोठ्या प्रमाणात वापरात आणणे गरजेचे आहे. ‘बायफ’ने सौरऊर्जेवर चालणारे दिवे आणि होमलाईट सोलर सिस्टिम आदिवासी भागात दिले आहेत. सुमारे अडीच हजार कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे. येत्या काळात सौरऊर्जेवर सिंचनाचे मोठे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी सांगितले.