- हेमंत आवारी अहमदनगर - अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील गावरान बियाणे संवर्धन करणार्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बी बियाणे यांचे पासून बनवलेली बीज राखी सोमवारी मंञीपदाची शपथ घेतलेल्या आपल्या मानलेल्या भावास, मंञी चंद्रकांत पाटील, बच्चू कडू यांना पाठवली आहे.
गत युती शासनात चंद्रकांत पाटील हे महसूल मंञी असताना त्यांच्या माध्यमातून कर्तव्य प्रतिष्ठानच्या वतीने राहीबाई यांना बीज बँकेसाठी ४६ लाखाचे चौमोळी चिरेबंदी पक्के घर ३६ दिवसात बांधून दिले. ही भेट सुपूर्त करण्यासाठी मंञी पाटील हेलीकॉप्टरने ३ मार्च २०१९ ला कोंभाळणे येथे आले होते. या आठवणींना उजाळा देतानाच मंञी पाटील यांनी मंगळवारी मंञीपदाची शपथ घेण्यापूर्वी पद्मश्री राहीबाई यांनी त्यांना बीज राखी पाठवली.
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया ! या मराठी गीताची आठवण, बहीण भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यासमोर येते. पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे. भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. राहीबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांचा राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचे सांगितले आहे.