लोकमत न्यूज नेटवर्क, जामखेड (जि. अहमदनगर) : धनगर समाजाला देशाच्या घटनेत आरक्षण दिले आहे, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. ते मिळवण्यासाठी ७५ वर्षांपासून लढा सुरू आहे. तुमचे आरक्षण सोपे असून मिळण्यास अडचण आहे, आम्हाला आरक्षण पदरात पाडण्यासाठी लढावे लागते. आता घराघरात जाऊन हा लढा आणखी तीव्र करावा लागेल. आरक्षण कसे मिळत नाही तेच बघू, असा इशारा मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
चौंडी (ता. जामखेड) येथे यशवंत सेनेतर्फे धनगर आरक्षणप्रश्नीदसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जरांगे पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे होते. यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार रामहरी रूपनवर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संभाजी शिंदे, डाॅ. शिवाजी राऊत, उज्ज्वला हाके, उत्तम पडळकर, ॲड. दिलीप येडतकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितीन धायगुडे, शांतीलाल कोपनर, प्रा. शिवाजी बंडगर आदी उपस्थित होते.
जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणप्रश्नी धनगराच्या शेवटच्या लोकापर्यंत लाट गेली तर कोणीच रोखू शकत नाही. मराठा-धनगर लहान-मोठा भाऊ मानत नाही. आपण एकच आहोत. तुम्हाला तुमच्या लेकराबाळाचे भविष्य चांगले करायचे असेल तर पेटून उठायला लागेल. मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहे.