श्रीरामपूर : कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कष्टकरी समाजातील १६ मुलांना एकत्र करून तयार झालेला ‘द मॅसेज आॅफ सॅल्व्हेशन’ हा लघु चित्रपट थेट इस्त्राईलमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘इस्त्राईलच्या अल्फा अॅन्ड ओमेगा’ या संस्थेने हा चित्रपट तेथे प्रदर्शित करण्याची जबाबदारी घेतली असून दिग्दर्शक, निर्माता अमितकुमार तोरणे यांचा दोन महिन्याचा खर्च करण्याचीही तयारी दर्शविली आहे. मात्र तेथपर्यंत पोहचण्यासाठी लागणारे पैसेही अमितकुमार यांच्याकडे नाहीत. ते उभे करण्यासाठी त्यांची धडपड आता सुरू आहे. अमितकुमार हा मूळचा पढेगाव (ता. श्रीरामपूर) येथील. वडील राहुरी न्यायालयात वकिलाकडे कारकुनी करतात, आई गृहिणी. शेती नसलेल्या तोरणे कुटुंबात तीन मुली व अमितकुमार हा एकुलता एक मुलगा. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने मुलांनी शिक्षणात स्वत:ला झोकून दिले. तोरणे यांच्या तीनही मुलींनी शिक्षणात उज्ज्वल नाव कमविले. मुलगाही मागे नव्हता. मात्र धार्मिक वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. उज्जैन येथे नोकरी करत असताना बायबलमधील एक प्रसंग त्याच्या मनाला भावला. त्यावर त्याने निबंध लिहिला. मात्र तो किती जणांना समजेल, अशी चिंता लागून असलेल्या अमितला मग लघुचित्रपट करण्याचे सूचले. त्यातून हा चित्रपट तयार झाला. ‘पश्यताप व पस्तावा यातील फरक व विश्वासाचे महत्त्व’ यावर आधारीत हा लघुपट नेवासा तालुक्यातील घोडेगाव, भानसहिवरा, राहुरी तालुक्यातील दरडगाव, ताहराबाद, श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव, लाडगाव, कान्हेगाव येथे चित्रीत करण्यात आला आहे. रात्रंदिवस कष्ट करत ९ दिवसांत हा लघुपट चित्रीत झाला. (प्रतिनिधी)
कष्टकऱ्यांचा लघुपट इस्त्राईलला
By admin | Published: August 09, 2016 11:52 PM