योगेश गुंडकेडगाव : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या पसंतीचे मत (क्रमांक एक) मिळविण्यासाठी नाशिकच्या एका उमेदवाराने चक्क मतदारांना खूष करण्यासाठी घरोघरी जाऊन पैठणी साड्यांचे वाटप सुरू केले आहे.या निवडणुकीच्या रिंगणात नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील एकूण १६ उमेदवार आहेत. यात नगर जिल्ह्यातील ७ उमेदवारांचा समावेश आहे. शिक्षकांचा मतदारसंघ असला तरी यात प्रथमच भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांसारखे राजकीय पक्ष उतरले आहेत. यामुळे शिक्षक असणाऱ्या उमेदवारांना प्रचार करताना शिक्षकच निवडून द्या, असे खास सांगण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात जवळपास १२ हजार मतदार आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक उमेदवार असल्याने जिल्ह्याला संधी मिळणार, की नाही? याची उत्सुकता वाढली आहे.प्रचाराला काही दिवस शिल्लक असताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून शिक्षक असणाºया मतदारांना खूष करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मेळावा व बैठकांच्या नावाखाली शिक्षक जमवून त्यांना हॉटेल किंवा कार्यालयात ओल्या पार्ट्या देऊन खूष करण्यात येत आहे. यात जिल्ह्याबाहेरील उमेदवार नगरी मतदारांना आकर्षित करण्याचा जास्त प्रयत्न करत आहेत.
उमेदवारांना वहिनींची काळजी की मतांची----नाशिकमधील एका उमेदवाराने तर नामी शिक्कल लढवत शिक्षक मतदारांच्या घरी जाऊन त्यांना चक्क खास येवल्याच्या पैठणी साड्या भेट देण्यास सुरूवात केली आहे. शिक्षकांना फोन करून त्यांचा पत्ता विचारायचा व प्रचार पत्रकासोबत पैठणी साडी द्यायची, असा प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहे. काही शिक्षकांनी यास नकार दिल्यास, ‘राहू द्या वहिनींना आवडेल,’ असे म्हणून ती पैठणी शिक्षकांच्या घरी जाऊन पोहोच करण्यात येत आहे. यामुळे शिक्षकांच्या सौभाग्यवतींना पैठणी मिळविण्यासाठी आदेश भावोजींच्या होम मिनिस्टरसारखी स्पर्धा खेळण्याची गरज आता उरली नाही. काही शिक्षकांनी मात्र नम्रतेने या पैठणी नाकारून आपल्या पवित्र पेशासोबत इमान राखण्याचा प्रयत्न केला आहे.एकूण १६ पैकी ७ उमेदवार नगरमधीलया निवडणुकीत एकूण १६ उमेदवार असून, त्यापैकी ७ जण नगर जिल्ह्यातील आहेत़ जिल्ह्यात जास्त उमेदवार असल्याने जिल्ह्यातील मतांची फाटाफूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संदीप बेडसे, किशोर दराडे या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांनी नगर जिल्ह्यात जास्त लक्ष केंद्रीत केले आहे़ याचा फटका कोणाला बसतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.