अहमदनगर : महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील उपआरोग्याधिकारी नरसिंह पैठणकर याला अडीच लाखांची लाच घेताना पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पैठणकर याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १७) सावेडी कचरा डेपो येथे अडीच लाख रूपयांची लाच घेताना पकडले होते. महानगरपालिका हद्दीत मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचे बिल काढण्यासाठी पैठणकर याने प्रकल्प चालकाकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती अडीच लाख रूपये देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावेडी कचरा डेपोजवळ सापळा लावून अडीच लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
दरम्यान, गुरूवारी पैठणकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले. गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का? त्यादृष्टीने सखोल तपास करायचा आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अर्जुन पवार, उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी केला. त्यानंतर न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी पैठणकर याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.
-----------
५५ लाखांची मालमत्ता
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पैठणकर याच्या सावेडीतील निर्मलनगरमधील राहत्या घराची झडती घेतली असता, घरासह मोकळी जागा, एफडी, दागिने अशी ५० ते ५५ लाख रूपयांची मालमत्ता त्याच्या मालकीची असल्याचे पथकाला आढळले.