प्रमोद आहेर । शिर्डी : सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.साईसंस्थानने १९२५ मध्ये तांबे-पितळेची भांडी मोडून आरतीला चांदीचे तबक केले होते. फंड वाढवण्यासाठी चार आणे, रूपयाची तिकिटे काढून विकली, बाबांचे खराब झालेले शेले विकले, नाटकाचे प्रयोग केले, समाधीच्या सभामंडपाचे बांधकाम पैशाअभावी तेवीस वर्षे सुरू होते. कोर्ट रिसीव्हरच्या काळात पोस्टाने आलेली पाकिटे उलगडून त्याचा आतील कोरा भाग कच्च्या टिपणांसाठी वापरला जात होता. पाकिटावरील ज्या तिकीटावर शिक्का नाही ते अलगद काढून टपाल पाठवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता. अशा अनेक बºयावाईट प्रसंगाना तोंड देत साईसंस्थानने केलेली काटकसर, योग्य नियोजन, भाविकांचे दातृत्व व ग्रामस्थांच्या सहकार्यातून साईसंस्थानने आर्थिक यशाचे शिखर गाठले. भाविक-देणगीदारांशी संस्थानचे संबंधसाईसंस्थानने भाविकांचे दर्शन व वास्तव्य आनंददायी होण्यासाठी त्याला समाधी स्पर्शसुख अनुभवू द्यावे. भक्तांना त्रास दिल्यास तो अक्षम्य गुन्हा समजला जावा़ पहिल्या व तिस-या सोमवारी शताब्दी मंडपात पादुका दर्शनासाठी ठेवाव्यात, देणगीदार लहान-मोठा किंवा ओळखीचा न बघता त्याला सन्मान द्यावा. देणगीदार व संस्थान यातील मध्यस्थ कमी करून संस्थानने थेट संपर्क ठेवावा. संस्थानच्या समाजोपयोगी प्रकल्पांची माहिती देणगीदारांपर्यंत पोहचवावी. प्रकल्पामध्ये देणगीदारांचा सहभाग वाढवावा. प्रकल्पांसाठी सीएसआर फंड मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. साईबाबांमुळे अनेकांचे मोठ्या व्यक्तींशी संबंध दृढ झाले आहेत, ते संस्थान व गावाच्या विकासासाठी वापरावेत. माजी विश्वस्त व अधिकाºयांना मोफत पासेसच्या मर्यादा निश्चित केल्या जाव्यात. खर्च कपातीचे धोरण स्वीकारणे आवश्यकप्रसादालय पुन्हा सशुल्क करायला हवे. साईआश्रमचे, दर्शन-आरती पासचे दर वाढवायला हवेत. बाबांना येणाºया शालींचा नियमित लिलाव व्हावा. वाहनांचा अनावश्यक ताफा, विजेचा अनावश्यक वापर कमी करायला हवा आहे. संस्थानच्या पडीक जमिनीत भाजीपाला पिकवायला हवा. उठसुट कुणालाही मूर्ती भेट देणे टाळायला हवे. रूग्णालय व शैक्षणिक संस्थेसाठी कन्सल्टंट नियुक्त करून गुणवत्ता वाढीबरोबरच खर्च व उत्पन्नावर नियंत्रण ठेवायला हवे़ श्रमपरिहारच्या भोजनावळी बंद कराव्यात़ याशिवाय शासनाने उठसुट संस्थान तिजोरीत हात घालून दानधर्म करण्याचा मोह काही वर्ष टाळला तरच साई संस्थानच्या आर्थिक आलेख वाढेल, असे जाणकार सांगतात.
आर्थिक मंदीशी लढण्यासाठी हवी पंचसूत्री; मोफत साईदर्शन पासेसला मर्यादा हव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 11:04 AM